वायनाड : २९८ जणांचा जीव घेणारी ३० जुलै २०२४ची मध्यरात्र आमच्यासाठी काळरात्र होती. आमचे सर्वस्व हिरावून घेणारी रात्र. वायनाडच्या मेप्पडीजवळील चुरलमाला, मुंडक्कई भागामध्ये प्रचंड पाऊस कोसळत होता. पाऊस आमच्या सवयीचा असला, तरी तो प्रहर वेगळाच होता. आम्ही गाढ झोपलो असताना भूस्खलन होऊन आमची गावे गाडली गेली. मी, माझी मुलगी आणि कुटुंबीयही त्यात अडकलो होतो. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती... मुंडक्कई गावातील रशीदचे कुटुंबीय त्या आठवणींनी आजही गोठल्यागत होते.
मेप्पडीजवळील चुरलमाला, मुंडक्कई गावातील आपत्तीग्रस्तांच्या वेदना आजही ठसठसत आहेत. ‘आम्ही आमचे आप्तेष्ट, शेजारी गमावले. दरडीखाली अडकून आम्ही मदतीसाठी जिवाच्या आकांताने धावा करत होतो. पहाटे कधीतरी आम्ही बाहेर आलो असू. मग शस्त्रक्रिया, मानसोपचार अशा साऱ्या चक्रातून गेलो. दीड वर्ष झाले. पण या धक्क्यातून आम्ही सावरलेलो नाही. माझ्या अगदी शेजारी राहणाऱ्या लहान लेकराचे आई-वडील गेले. त्याच्याकडे पाहून आजही जीव तुटतो...’ हे सांगताना साहीशच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. आणखी एक आपत्तीग्रस्त जयेशनेही त्या संकटात डोक्यावरील छप्पर आणि सर्वस्व हिरावले गेल्याची करुण कहाणी सांगितली.

