मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर तेथील जैववैद्यकीय कचरा भस्मीकरण प्रकल्प अंबरनाथ एमआयडीसी क्षेत्रात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र स्थानिक नागरिकांसह आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठक बोलावली. या बैठकीतील चर्चेनंतर प्रकल्पामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे आढळल्यास तत्काळ स्थगिती देण्याच्या सूचना केली.
मानखुर्द परिसरात निवासी भागांच्या जवळ असल्यामुळे जैववैद्यकीय कचरा भस्मीकरण प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर हा प्रकल्प अंबरनाथ आनंद एमआयडीसीत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्थलांतरासाठी २१ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर या निर्णयाला विरोध वाढत आहे.
या प्रकल्पाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवणारे शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी अनिल भोईर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनीही बैठकीत प्रकल्पाविरोधात ठाम भूमिका मांडली. बैठकीत संबंधित कंपनीकडून प्रकल्पाचे सादरीकरण घेऊन सर्व बाबींची माहिती करून घेण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आले.

