शंभर फुटांहून अधिक रुंद रस्त्याच्या निम्मा भाग वाहने उभी करून अडवणाऱ्या माफियांना ठाणे महापालिकेकडून कारवाईचा दणका दिला आहे. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रातील रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करत पदपथ मोकळे करण्याची मोहीम महापालिकेकडून राबवण्यात आली. यावेळी चार कार, तीन रिक्षा, १२ दुचाकी अशी वाहने बाटा कंपाऊंडमध्ये जप्त करण्यात आली. ही कारवाई केवळ एकदिवसापुरती मर्यादित न राहता या भागातील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
महापालिका हद्दीतील लोकमान्य सावरकर प्रभाग समिती हद्दीतील रस्ते रुंद करण्यात आले असून दुकानदारांकडून अतिक्रमण े करण्यात आली आहेत. बेकायदा वाहने उभी करून अर्ध्याहून अधिक रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आल्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. पादचाऱ्यांना पदपथवर चालणेही अवघड झाले आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने कारवाईची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नुकतीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्रभागात रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्त सौरभ राव यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभाग, पोलिस विभाग आणि वाहतूक विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
यावेळी अनधिकृतपणे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या बेवारस १९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. लोकमान्य सावरकर प्रभाग समितीतील महात्मा फुलेनगर, कोरस रोड, वेदांत कॉम्प्लेक्स समोरील रस्ता, यशोधननगर, लोकमान्य बस डेपो परिसरातील अतिक्रमण व बेवारस वाहनांविरुद्ध ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यापूर्वी मार्चमध्ये प्रभाग समिती अंतर्गत एकूण ३२ बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली होती.

