भारताच्या बॉक्सरकडूनसुवर्णपदकांची लयलूट

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सरनी सुवर्णपदकांची लयलूट केली. मीनाक्षी हुड्डा आणि प्रीती पवार यांनी सुवर्णपदके जिंकली. प्रिया घनघस आणि अरुंधती चौधरी यांनीही अव्वल स्थान पटकावले. जास्मिन लांबोरिया हिला मात्र अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. अल्फिया पठाणला रौप्यपदक मिळाले.

the golden tale of indian boxing the story of meenakshi and preetis victory

जगज्जेती मीनाक्षी हुड्डा आणि प्रीती पवार यांनी गुरुवारी आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताला सुवर्णपदकांची कमाई करून दिली. विशेष म्हणजे भारताच्या आणखी दोन बॉक्सरनीही अंतिम फेरीत बाजी मारत अव्वल स्थान पटकावले.

मीनाक्षीने ४८ किलो, तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील ब्राँझपदक विजेती प्रीतीने ५४ किलो वजनी गटात वर्चस्व राखले. त्यांच्यासह प्रिया घनघस (६० किलो) आणि वर्ल्ड बॉक्सिंग कप स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती अरुंधती चौधरीनेही (७० किलो) सुवर्ण कामगिरी केली.

मीनाक्षीने मंगोलियाच्या नोमुंदारी एन्ख-अमगलन हिचा ५-० असा फडशा पाडत गुरुवारी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. प्रीतीच्या यशाचे जास्त कौतुक होत आहे. दमदार कामगिरीत सातत्य राखत तिने तैवानच्या हुआंग शिआओ-वेन हिचा ५-० असा धुव्वा उडवला. हुआंगने तीनवेळा जगज्जेतेपद पटकावले असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने ब्राँझपदकही पटकावले होते.प्रियाने उत्तर कोरियाच्या वॉन उन-ग्योंग हिच्यावर ३-० असा विजय मिळवत सुवर्ण निश्चित केले. तर अरुंधतीने अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या बख्यत सेइदिश हिच्यावर ४-१ अशी मात करत जेतेपदाचा मान पटकावला.

-जास्मिनचा अनपेक्षित पराभव

भारताला ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मात्र मोठा धक्का बसला. जगज्जेत्या जास्मिन लांबोरिया हिला थायलंडच्या पुनरावी रुएनरोस हिच्याकडून ०-५ असा पराभव स्वीकारावा लागला. पुनरावीने जागतिक स्पर्धेत दोनवेळा रौप्यपदक पटकावले आहे. अल्फिया पठाण (80+ किलो) हिलाही रौप्यपदक लाभले. तिला कझाकिस्तानच्या दिना इस्लामबेकोवा हिच्याकडून ०-५ अशी एकतर्फी हार पत्करावी लागली.