कोट्यवधींची ‘नोंदणी’

महाराष्ट्र टाइम्स

कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील आर्थिक वर्षात ४३७ कोटी ८० लाख रुपयांचा विक्रमी महसूल जमा केला आहे. वाहनांची वाढती संख्या आणि नोंदणीमुळे हा आकडा गाठला गेला. शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट ओलांडून विभागाने मोठी कामगिरी केली आहे. या महसुलात वाहन नोंदणीचा मोठा वाटा आहे. जुन्या वाहनांना ग्रीन प्लेट आणि आकर्षक नंबर प्लेट्समुळेही तिजोरीत भर पडली आहे.

billions in vehicle registration rto achieves outstanding revenue

स्वतःचे वाहन ही गरजेची वस्तू बनल्याने प्रत्येकाकडे किमान एक तरी वाहन आहेच. मात्र त्याचबरोबर दुचाकी आणि चारचाकी गाड्या खरेदीची लागलेली स्पर्धा, मधल्या काळात असलेले मुक्त रिक्षा परवाने यांमुळे वाहन नोंदणीची संख्या कमालीची वाढली आहे. मागील आर्थिक वर्षात उपप्रादेशिक परिवहन विभागाने ४३७ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. आजवर कल्याण आरटीओकडून गोळा झालेला हा सर्वाधिक निधी असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितले.

मागील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४-२५मध्ये कल्याण कार्यालयातून तीनशे बाहत्तर कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. यामुळे शासनाकडून यंदाच्या वर्षासाठी ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट कार्यालयाला ठरवून दिले होते. या उद्दिष्टाचा पाठलाग करताना आरटीओ विभागाने ४३७ कोटी रुपयांची मजल मारली आहे.

दरम्यान, या महसुलामध्ये सर्वाधिक हिस्सा वाहन नोंदणीमधून प्राप्त झाला असून वर्षभरात या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूरसह कल्याण ग्रामीण भागांतून एक लाख आठ हजार १२५ वाहनांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये ७९ हजार ५५७ दुचाकी, १६ हजार ८२६ चारचाकी, ३,५७१ रिक्षा, ४,२९२ मालवाहू वाहने तसेच प्रवासी वाहने आणि इतर वाहने यांचा समावेश आहे.

जुन्या वाहनांना ग्रीन प्लेट, आकर्षक नंबरसाठी तगडी फी यामुळेही आरटीओच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा झाली आहे.