महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यापीठात सात ते १४ एप्रिलच्या दरम्यान डॉ. आंबेडकर जयंती महोत्सवाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (११ एप्रिल) महात्मा फुले जयंतीनिमित्त माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांचे ‘विश्वकर्ता शिक्षणतज्ज्ञ महात्मा फुले आणि वर्तमान शिक्षण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. रविवारी (१२ एप्रिल) ज्ञानस्त्रोत केंद्राच्या माध्यमातून ग्रंथालयात १८ तास वाचन उपक्रम घेतला जाणार आहे, सायंकाळी डॉ. आंबेडकर संशोधन केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या नाट्यगृहात ‘भीमगीत जलसा’चे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी चेतन कुमार चोपडे व सहकारी भीमगीत रजनी सादर करणार आहेत.
१४ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रख्यात विचारवंत प्रा. प्रदीप गोखले (पुणे) यांचे व्याख्यान होणार आहे, अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय फुलारी राहणार आहेत. या वेळी ‘गीत भिमायन’ या प्रकल्पातील २४व्या गीताचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

