सहलींसाठी एसटीला पसंती

महाराष्ट्र टाइम्स

शाळा आणि महाविद्यालयांतील सहलींसाठी एसटी बसला मोठी पसंती मिळत आहे. यंदा एसटी महामंडळाला सहलींमधून १२७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एसटीने प्रवास सुरक्षित केला असून उत्पन्नातही वाढ झाली आहे. खासगी बसऐवजी एसटीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नव्या गाड्या देण्यावर भर दिला जात आहे.

growing popularity of st buses for educational tours

शाळा-महाविद्यालयांतील सहली आणि शैक्षणिक भेटींसाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसगाड्यांना पसंती मिळत आहे. यंदा शालेय सहलींसाठी महामंडळाने २५ हजार ५५८ फेऱ्या चालवल्या. त्यातून महामंडळाला १२७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३३ कोटी रुपयांची भर पडली आहे.

धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांच्या भेटींसाठी शाळांकडून मोठ्या प्रमाणात सहली आयोजित केल्या जातात. अशा सहलींसाठी एसटी बस आरक्षित केल्यास प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. तालुका-जिल्ह्यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळतो.

सन २०२४-२५मध्ये सहलींसाठी एसटीच्या २० हजार १४० फेऱ्या पूर्ण झाल्या. सन २०२५-२६ मध्ये यात पाच हजार ४१८ फेऱ्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यंदा १२७ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी ९३ कोटी ८९ लाख रुपये इतका महसूल प्राप्त झाला होता.

एसटीच्या या उपक्रमामुळे केवळ विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित झाला एवढेच नाही, तर महामंडळाच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. आगामी शैक्षणिक वर्षातही शाळा आणि महाविद्यालयांनी खासगी बसऐवजी एसटीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

सहलींसाठी प्राधान्याने नव्या आणि सुस्थितीतील गाड्या देण्याच्या सूचना महामंडळाच्या सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. तसेच, विभाग नियंत्रकांकडून त्यांच्या हद्दीतील शाळा-महाविद्यालयांना भेटी देण्यात येत आहेत. यामुळे सहलींतून येणाऱ्या महसुलात वाढ नोंदवली जात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.