राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त

महाराष्ट्र टाइम्स

ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. यामुळे पक्षाची ठाणे शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्षबांधणीची नवी मोहीम हाती घेतली जाईल. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल. कार्यकर्त्यांनी निराश न होता कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

nationalist congress committee executive dissolved new direction after failure in thane municipal elections

ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश संपादन करण्यात अपयशी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाची ठाणे शहर कार्यकारिणी बैठकीत तडकाफडकी बरखास्त केली आहे. येत्या काळात संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी नेत्यांनी पक्षबांधणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये जुने जाणते कार्यकर्ते आणि निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून भविष्यात संघटनबांधणीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचा निर्वाळा बैठकीत नेतेमंडळींनी दिला.

ठाणे महापालिका निवडणुकांचे निकाल तीन महिन्यांपूर्वी लागले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अवघ्या नऊ जागांपर्यंतच मजल मारू शकली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात जोरदार प्रवेश झाले. केंद्र आणि राज्यात महायुतीसोबत सत्तेत शिवसेना-भाजपसोबत एकत्र असलेल्या 'राष्ट्रवादी'ने ठाण्यात 'एकला चलो रे'चा नारा दिला. यावेळी आयारामांना संधी देताना पक्षाने जुन्या कार्यकर्त्यांनाही पक्षाचे तिकीट देत रिंगणात उतरवले. मात्र निवडणुकीत पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यातच पक्षाच्या हातातून पालिकेचे विरोधी पक्षनेतेपदही गेले.

पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक निधन झाल्याने पक्षात मरगळ आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष व पालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांनी सर्व सेलचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व सेलच्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय मुल्ला यांनी घेत पदाधिकारी-कार्यकर्त्यांना निराश न होता 'कामाला लागा' असा सल्ला दिला. लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे मुल्ला यांनी याप्रसंगी जाहीर केले.