ठप्प ‘एसटीपी’चा खेळ उघड

Contributed byमहापालिका आयुक्त|महाराष्ट्र टाइम्स

पाषाण तलावातील जलजीवन मोठ्या प्रमाणावर मृत झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) बंद असतानाही सुरू असल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून, चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. आयुक्तांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

pashan lake sewage treatment plant stp stalled action against concerned officials

पाषाण तलावातील जलजीवन मोठ्या प्रमाणावर मृत झाल्याच्या घटनेप्रकरणी मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांच्यावर ठपका ठेवला आहे. तलावालगत असलेले सुमारे एक एमएलडी क्षमतेचे शुद्धीकरण केंद्र योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याचे तपासात आढळले. प्राथमिक चौकशीत ही बाब निष्काळजीपणामुळे घडल्याचे स्पष्ट झाले. ‘आपल्यावर कारवाई का करू नये,’ असा सवाल उपस्थित करून अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खुलासा समाधानकारक न ठरल्यास प्रशासकीय कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

पाषाण तलावातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) प्रत्यक्षात बंद असतानाही तो सुरू असल्याचे कागदोपत्री दाखवून कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटल्याचा धक्कादायक प्रकार महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या ‘सरप्राइज’ पाहणीत उघड झाला. या प्रकरणी मलनिस्सारण व देखभाल-दुरुस्ती विभागातील चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे; तसेच प्रकल्पाच्या सल्लागार कंपनी ‘प्रायमूव्ह’चा करार रद्द करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

पाषाण तलावातील वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राम यांनी शुक्रवारी सकाळी अचानक भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तलावाच्या पाण्यावर जलपर्णीचे साम्राज्य पसरलेले असून, प्रदूषणामुळे मासे मृतावस्थेत आढळले. या पाहणीत ‘एसटीपी’मधून प्रत्यक्षात पाणी शुद्धीकरण होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. शुद्धीकरणासाठी पाणीच येत नसल्याने आणि प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तलावात स्वच्छ पाणी सोडले जात नसल्याचे स्पष्ट झाले. परिसरात कचऱ्याचे ढिगही आढळले.

यानंतर आयुक्तांनी तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे खुलासा मागितला. मात्र, अधिकाऱ्यांनी ‘एसटीपी’ सुरळीत सुरू असल्याचा दावा केल्याने संतप्त झालेल्या आयुक्तांनी कठोर कारवाईचा बडगा उगारून कार्यकारी अभियंता अजयकुमार वायसे, कनिष्ठ अभियंता अतुलकुमार कडू, विभागीय आरोग्य निरीक्षक विजय भोईर व विनायक चोपडे यांना निलंबित केले. विभागप्रमुख जगदीश खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या पाहणीत स्थानिक लोकप्रतिनिधी मयुरी कोकाटे व माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. बावधन व पाषाण परिसरातून दररोज सुमारे १५ एमएलडी मैलापाणी तलावात मिसळत असल्याचे समोर आले. यातील मोठा भाग महापालिकेच्या हद्दीबाहेरील असल्याने आयुक्तांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनाही हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले आहेत; तसेच परिसरातील उद्योगांचे शुद्धीकरण प्रकल्प (ईटीपी) कार्यरत आहेत का, याची तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्याकडे त्याची जबाबदारी सोपवली आहे. नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांना ‘सरप्राइज’ भेटींचा धडाका लावण्याचे आदेश दिले असून, प्रशासनातील हलगर्जीपणाला लगाम घालण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

संबंधित वृत्त... ४