‘रायलादेवी’ची रया गेली!

महाराष्ट्र टाइम्स

रायलादेवी तलाव आता मद्यपींचा अड्डा बनले आहे. चाळीस कोटींहून अधिक खर्च करून सुशोभित केलेले हे तलाव आता कचरा आणि फुटलेल्या बाटल्यांनी भरले आहे. यामुळे ठाणेकरांचे विरंगुळाकेंद्राचे स्वप्न भंगले आहे. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांसाठी हे ठिकाण भीतीदायक बनले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

rayaladevi lakes deterioration the reality

मद्याच्या बाटल्यांचा खच, फुटलेल्या बाटल्यांच्या काचा, साहित्याची तोडफोड, सुशोभीकरणावर धुळीचे साम्राज्य, जागोजागी फेकलेला कचरा... मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या निधीतून चाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्ची करून सुशोभित करण्यात आलेल्या रायलादेवी तलावाची ही स्थिती अत्यंत विदारक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या तलावाच्या या दुरवस्थेमुळे ठाणेकरांच्या विरंगुळाकेंद्राचे स्वप्न भंग पावले असून हा मद्यपींचा अड्डा बनल्याने ठाण्यातील पर्यावरणप्रेमींना धक्कादायक बसला आहे. विशेष म्हणजे या तलावासाठी परिसरातील ११७हून अधिक झाडे तोडण्यात आली होती. तर या तलावाच्या सुशोभीकरण कामादरम्यान शेकडो कासव आणि जलचरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सुशोभीकरणामुळे या तलावाचे नवे रूप पाहण्याची अपेक्षा असलेल्या ठाणेकरांना रया गेलेल्या रायलादेवीचे दर्शन घडत आहे.

तलावांचे शहर असलेल्या ठाण्यातील रायलादेवी हा अत्यंत महत्त्वाचा तलाव असून निसर्गसंपन्न या तलावाचे सुशोभीकरण कामानंतर उकिरड्यामध्ये रूपांतर झाले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून या तलावाच्या सुशोभीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. परंतु या कामाची योग्य देखभाल आणि सुरक्षा केली जात नसल्याने या ठिकाणी मद्यपींनी अतिक्रमण केले आहे. मद्यपींकडून या भागात उघड्यावर मद्यपान करून बाटल्या त्याच ठिकाणी फेकल्या जात आहेत.

खाद्यपदार्थांचे रॅपर, प्लास्टिकचा खच इथे फेकला जात आहे. तर केबिन्सची काच फोडण्यात आली आहे. मद्यपी, नशेखोर आणि गर्दुल्ल्यांचा या भागात वावर असल्याने येथे येणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिलांसाठी हे ठिकाण विरंगुळ्यापेक्षा भीतीदायक ठरू लागले आहे. स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले-जाधव यांनी यासंदर्भात आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून या तलाव परिसराची दुरवस्था थांबवण्याची मागणी केली आहे.