शांतता चर्चेवर हल्ल्यांचे सावट

Contributed byअध्यक्ष,उपाध्यक्ष|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चा होणार आहे. मात्र, हल्ल्यांच्या घटनांमुळे या चर्चेवर चिंतेचे सावट आहे. इराणने लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. तर, अमेरिकेने इराणला इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीवरूनही तणाव आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे.

शांतता चर्चेवर हल्ल्यांचे सावट

अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाला असला तरी शनिवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणाऱ्या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेवर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. इराणने आमच्या भूभागावर हल्ले केल्याचा दावा कुवेत आणि सौदी अरेबिया यांनी केला, तर लेबनॉनवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत वाटाघाटी होऊ शकत नाही, अशी भूमिका इराणने घेतली. ‘त्यावर आमच्याशी जास्त खेळू नका,’ असा इशारा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी चर्चेसाठी इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी इराणला दिला.

लेबनॉनवरील हल्ले, होर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी या घडामोडींबाबत आपापल्या भूमिकांवर ठाम राहणाऱ्या इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यात शनिवारी इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे. त्यासाठी पाकिस्तानने जय्यत तयारी केली आहे. मात्र, तत्पूर्वी शुक्रवारी दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या.

‘इस्रायलने लेबनॉनमधील हल्ले थांबवले नाहीत, तर शनिवारी वाटाघाटी होऊच शकत नाहीत,’ अशी इराणची भूमिका असल्याचे वृत्त ‘तस्नीम’ या इराणच्या अर्धसरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे, तर ‘होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या विनाशुल्क वाहतुकीला परवानगी न देणारा इराण अत्यंत वाईट काम करत आहे,’ असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचे निःशस्त्रीकरण व शेजारी देशांमध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी लेबनॉनशी ‘शक्य तितक्या लवकर’ थेट वाटाघाटींना इस्रायलने अधिकृत मंजुरी दिल्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये इस्रायल-लेबनॉन वाटाघाटी सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. वॉशिंग्टनमधील चर्चेत अमेरिकेच्या वतीने लेबनॉनमधील अमेरिकी राजदूत मिशेल इसा व इस्रायलकडून अमेरिकेतील इस्रायली राजदूत येचिएल लायटर सहभागी होण्याचा अंदाज आहे. लेबनॉनचे प्रतिनिधित्व कोण करील, हे अद्याप स्पष्ट नाही. लेबनॉनने याबाबत तत्काळ भूमिका मांडली नाही.

दरम्यान, मागील आठवड्यात हवाई हल्ल्यात जखमी झालेले इराणचे माजी परराष्ट्रमंत्री कमाल खराझी यांचा गुरुवारी रात्री उशिरा मृत्यू झाला, असे इराणच्या सरकारी टीव्ही वाहिनीने जाहीर केले.

संबंधित वृत्त... फ्रंट पेज २