आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 'जग विक्रम' हे भारतीय जहाज होर्मूझची सामुद्रधुनी ओलांडणारे पहिले भारतीय जहाज ठरले आहे. सरकारने डिझेल आणि विमान इंधनावरील विंडफॉल कर वाढवला आहे. चागोस बेटांचे हस्तांतरण लांबणीवर पडले आहे. एकलहरे ग्रामपंचायतीने वीज निर्मिती प्रकल्पाला थकीत घरपट्टीसाठी जप्तीची नोटीस बजावली आहे.

आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका

मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (वय ९२) यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दक्षिण मुंबईतील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, आशा भोसले यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयामध्ये तातडीने दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या वैद्यकीय स्थितीवर लक्ष ठेवून आहे. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात कोणतेही वैद्यकीय निवेदन जारी केलेले नाही.

‘जग विक्रम’ होर्मूझपार

नवी दिल्ली : एनपीजीवाहू ‘जग विक्रम’ या भारतीय जहाजाने शुक्रवार रात्र आणि शनिवार सकाळ या दरम्यान होर्मूझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. ओमानच्या आखातात, शनिवारी दुपारी होर्मुझच्या पूर्वेला असलेले हे जहाज पूर्व दिशेला मार्गक्रमण करीत होते. अमेरिका-इराण यांच्यातील युद्धविरामाच्या घोषणेनंतर होर्मूझ ओलांडणारे ते पहिले भारतीय जहाज आहे. मुंबईस्थित ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनीच्या या जहाजात २० हजार टन एलपीजी असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

डिझेल करात वाढ

नवी दिल्ली : सरकारने शनिवारी डिझेलवरील विंडफॉल कर वाढवून प्रति लिटर ५५.५ रुपये आणि विमान इंधन (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) वर प्रति लिटर ४२ रुपये केला. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही करवाढ तत्काळ लागू होणार आहे. सरकारने यापूर्वी २६ मार्च रोजी डिझेलवर प्रतिलिटर २१.५० रुपये आणि एटीएफवर प्रति लिटर २९.५ रुपये विंडफॉल कर लागू केला होता. पश्चिम आशियातील युद्धामुळे देशांतर्गत इंधनाची उपलब्धता वाढवण्यासाठी हे शुल्क लावण्यात आले होते.

हस्तांतरण लांबणीवर

लंडन : हिंदी महासागरातील चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसला बहाल करण्याचा ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे.

जप्तीची नोटीस

नाशिकरोड : एकलहरे ग्रामपंचायतीने थकीत घरपट्टीच्या वसुलीसाठी एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला थेट अंतिम जप्तीची नोटीस बजावली आहे. वीज निर्मिती प्रकल्पाकडे ५ कोटी १७ लाख ५३ हजार ७१२ रुपये कर थकबाकी आहे. थकबाकी भरण्यास एकलहरे वीजनिर्मिती प्रकल्पाकडून सहकार्य होत नसल्याने ग्रामपंचायतीने नोटीस बजावली.