पुणे : खानवडी येथील शाळेच्या उद्घाटनासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी कार्यक्रमस्थळी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर चारचाकी वाहन पार्किंगच्या जागेत उतरविण्यात आले.
हेलिपॅड असल्याच्या समजातून पायलटने हेलिकॉप्टर वाहनांसाठी असलेल्या पार्किंगमध्ये उतरविले. भुजबळ हेलिकॉप्टरमधून बाहेर आल्यानंतर त्यांचे पार्किंगमध्ये उतरवलेले हेलिकॉप्टर हे मूळ हेलिपॅडकडे नेण्यात आले. या प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. ‘मला याबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, या बाबत तत्काळ चौकशी करण्यात येईल,’ असे त्यांनी सांगितले. भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या पायलटने केलेल्या चुकीबाबत समाजमाध्यमांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्या वेळी आमदार रोहित पवार यांनीही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले.







