दिल्लीत रंगले महिला अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीत महिला अधिकाऱ्यांचे पहिले साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात साहित्य आणि सामाजिक कार्यावर विचारमंथन झाले. माजी माहिती संचालक श्रद्धा बेलसरे यांनी संगणकावर आधारित कविता सादर केली. संमेलनाध्यक्षा लीना मेहेंदळे यांनी देवदासी प्रथा निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचा अनुभव सांगितला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

दिल्लीत रंगले महिला अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन

नवी दिल्ली : ‘संगणकाचा गुण माणसाला लागला की, माणसाला संगणकाचा हे माहिती नाही, पण माणसासारखीच फाइलही होते करप्ट’, राज्याच्या माजी माहिती संचालक श्रद्धा बेलसरे यांनी शनिवारी केलेल्या फाइलच्या काव्यमय वर्णनाला बहिणाबाई चौधरी सभागृहातील उपस्थितांनी मनापासून दाद दिली. शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी कवयित्री महिला अधिकाऱ्यांची काव्यस्पंदने उलगडणारी तीन कविसंमेलनेही रंगली.

महाराणी ताराबाई यांच्या ३५१व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र सदन, ‘सरहद, पुणे’ आणि राज्य शासनाच्या ‘मराठी भाषा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा प्रारंभ नवीन महाराष्ट्र सदनाच्या आवारातून काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीने झाला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे सचिव युवराज मलिक, संमेलनाध्यक्ष लीना मेहेंदळे, निमंत्रक व सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला, स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी, माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, ‘सरहद’चे संजय नहार, लेशपाल जवळगे आदींसह दिल्लीतील मराठी बांधव या सोहळ्याला उपस्थित होते.

प्रशासकीय खुर्चीवर बसून केवळ फायली निकाली काढणे म्हणजे कर्तव्य नव्हे, तर अनिष्ट प्रथा मुळापासून उपटण्यासाठी त्या पदाचा वापर करणे ही खरी लोकसेवा आहे, असे संमेलनाध्यक्षा लीना मेहंदळे यांनी सांगितले. मेहंदळे यांनी सांगलीतील देवदासी प्रथा निर्मूलनासाठी दिलेल्या लढ्यातील अनुभव सांगितले. देवीच्या कोपाची भीती झुगारून कायद्याचे रक्षण केल्याचे त्या म्हणाल्या.