नाशिकरोडला परिचारिकेची आत्महत्या

महाराष्ट्र टाइम्स

नाशिकरोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये तन्वी भदाणे या २२ वर्षीय परिचारिकेने आत्महत्या केली. शनिवारी दुपारी तिच्या खोलीत तिचा मृतदेह आढळला. तन्वीने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

nashik road nurse suicide crime or mental health issue

शहरातील जयराम हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर रुग्णालयातील परिचारिका तन्वी नानाभाऊ भदाणे (वय २२) हिने रुग्णालयातील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. ११) दुपारी उघडकीस आली. मूळची गुंजाळनगर (ता. देवळा) येथील असलेली तन्वी भदाणे जयराम रुग्णालयात दीड वर्षापासून कार्यरत होती. परिचारिकांसाठी रुग्णालयाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर निवासव्यवस्था होती. तन्वी भदाणे हिने शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपली ड्युटी पूर्ण केली होती. तिच्या सहकारी परिचारिकांनी शनिवारी दुपारी सव्वाच्या सुमारास तिच्या खोलीचा दरवाजा उघडला असता तन्वी गळफास घेतल्याचे आढळले. तन्वीला तत्काळ खाली उतरवून उपचारासाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

तन्वीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून नाशिकरोड पोलिसांना माहिती देण्यात आली. तन्वीच्या मागे आई-वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे. तिच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याचे समजते.