एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंत्यांच्या सही, स्वाक्षरी, कार्यालयाची माहिती, संपर्क क्रमांक आणि शिक्क्यांचा बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार ऑगस्ट २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत घडला असून, एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील व्यवस्थापक इम्रान युसूफ खान यांनी नाशिकरोड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
खान यांच्या फिर्यादीनुसार संशयित बाळू रतन कोकाटे (रा. एकलहरे कॉलनी) आणि के. एस. सोनवणे या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू कोकाटे याने के. एस. सोनवणे याच्याशी संगनमत करून सोनवणे याच्या अर्जासोबत बनावट दस्तऐवज बनवून मुख्य अभियंत्यांकडे सादर केले. संशयितांनी एकलहरे वीजनिर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयाकडून निर्गमित न झालेले दस्तऐवज तयार करून त्यावर आर्थिक फायद्यासाठी मुख्य अभियंत्यांची बनावट स्वाक्षरी, शिक्क्यांचा वापर करून बनावट कागदपत्र सादर करून ते खरे असल्याचे भासवले. पोलिस उपनिरीक्षक शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.








