हडपसर : हडपसर उपनगरात मागील दहा दिवसांत पाण्याच्या टँकरच्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ पाच आणि सहामधील आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जड वाहनांच्या अपघातांमध्ये १५ महिन्यांत १२५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेषतः वेगाने धावणारे पाण्याचे टँकर, ट्रक, डंपर, टेम्पो, हायवा आणि इतर जड वाहने परिसरातील रस्ते सुरक्षेसाठी गंभीर आव्हान ठरत असल्याचे चित्र आहे.
हडपसर उपनगरामध्ये पुणे-सोलापूर रस्ता व हडपसर-सासवड रस्ता असे दोन महामार्ग आहेत. या दोन मार्गांवरच जड वाहतुकीद्वारे अपघाताच्या सर्वांत जास्त घटना घडल्या असून, यामध्ये मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. हडपसर, फुरसुंगी, काळेपडळ, मुंढवा, लोणी काळभोर, वानवडी, मांजरी आणि कोंढवा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मागील १५ महिन्यांमध्ये १२५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर किरकोळ जखमी झालेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
मागील दहा दिवसांत पाण्याच्या टँकरने एनआयबीएम, वानवडी व हडपसर येथे दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने वानवडी एनआयबीएम परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून टँकरविरोधात आंदोलन केले होते. एकीकडे पाण्याचे टँकर नागरिकांचे तहान भागवत असतात. मात्र, दुसरीकडे टँकरचालक पैसे कमावण्याच्या नादात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून फेऱ्या वाढवण्यामध्ये मग्न असतात. स्थानिकांचे टँकर असल्याने वाहतूक पोलिसांकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. अपघाताच्या आकडेवारीवरून हडपसर, लोणी काळभोर, फुरसुंगी व काळेपडळ पोलिस ठाण्यांच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांनीही प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली असून, अपघातानंतर उपाययोजना नव्हे, तर अपघात टाळण्यासाठी नियोजन हवे, अशी भावना व्यक्त होत आहे.
चौकात चौकात उभे असलेले वाहतूक पोलिस केवळ दंडात्मक कारवाईकडे लक्ष देतात. वाहतूक नियमन करण्याकडे ते दुर्लक्ष करीत असल्याने बेशिस्त वाहनचालकांचे मनोधौर्य वाढून अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यास अपघात होणार नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.








