‘ दूरदर्शन ’चा सुवर्णकाळ गाजवणारे कल्पक निर्माते-दिग्दर्शक आणि कवी अरुण काकतकर (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री राधिका काकतकर-इंगळे या त्यांच्या कन्या होत.
‘शब्दांच्या पलीकडले’सारख्या दर्जेदार कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती, दिग्दर्शन केले. मंगेशकर कुटुंबीयांना; तसेच प्रसिद्ध कवी संगीतकारांना दूरदर्शनवर आणून अनेक भावरम्य गीतांचे सादरीकरण त्यांनी केले. गो. नी. दांडेकर यांच्या ‘पडघवली’ कादंबरीवर आधारित चित्रपटासह त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले. त्यांची ‘व्यक्तकं’ आणि ‘रंगांना फुटले पंख’ ही पुस्तके प्रकाशित झाली होती.








