‘श्यामबरन मन हरन माधुरी
मूरत अतिप्रिय लागी...’
असं भगवान श्रीरामाचं वर्णन संत तुलसीदास यांनी केलं आहे. रामाच्या कांतीचं वर्णन करतांना तुलसीदास म्हणतात की, ‘तो श्यामलवर्णी आहे आणि त्याची तशी मूर्ती न्याहाळतांना मन हरखून जातं.’ संगीत परंपरा रामभक्तीशी अत्यंत घट्टपणे जोडलेली आहे. विष्णु दिगंबर पलुस्करांनी एकीकडे संगीताच्या विश्वात सामाजिक सुधारणा आणि कलेविषयी आणि कलाकाराविषयी सन्मान यांचं वारं प्रवाहित केलं. आणि दुसरीकडे अनाक्रमक रामभक्तीला प्राधान्य दिलं. पलुस्करांच्या आणि त्यांचे सुपुत्र द. वि.पलुस्करांच्या रामभक्तीपर रचनांचा प्रभाव महात्मा गांधीवरही मोठ्या प्रमाणावर पडला होता. गांधीजी ‘रामरतन धन पायो ’ किंवा ‘जानकीनाथ सहाय करे जब ’सारखी भजनं मनापासून आणि कान लावून ऐकत असत.
तुलनेने आधुनिक काळात जन्मलेले आणि गेल्या वर्षी २१ एप्रिल रोजी निवर्तलेले गायक श्रीपाद पराडकर हे अत्यंत गुणी कलावंत रामभक्त होते. मुंबईतल्या गिरगाव भागातल्या झाबबा राममंदिरालगत त्यांचं वास्तव्य असे. दक्षिण मुंबई हा एकेकाळी संगीताचा ‘गढ ’ म्हणून ओळखला जात असे. या परिसरात राहून त्यांनी अनेक मैफली गाजवल्या. त्याचप्रमाणे आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांमधून रागदारी संगीत आणि भक्तिसंगीताचा प्रसार ते करत राहिले. ‘सूर सिंगार संसद ’ या अत्यंत प्रतिष्ठीत संस्थेकडून त्यांना ‘सूरमणी ’ ही पदवी प्रदान करण्यात आली होती.
श्रीपाद पराडकर यांचे पहिले गुरू म्हणजे त्यांचे वडील राजारामबुवा पराडकर. राजारामबुवा हे झाबबा राममंदिराचे पारंपरिक पुजारी तर होतेच; परंतु ग्वाल्हेर/इचलकरंजीकर शाखेचे उत्तम गवई म्हणूनही त्यांचा लौकिक होता. राजारामबुवा हे यशवंतराव मिराशीबुवा यांचे शिष्य. मिराशीबुवांची गायकी दमदार आणि जोरकस. राजारामबुवांनी ती आत्मसात करून त्यावर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा साज चढवून आपली विशेष ओळख निर्माण केली. द. वि. पलुस्कर, रामभाऊ मराठे, यशवंतबुवा जोशी आणि चिंतामणी रघुनाथ व्यास हेही मिराशीबुवा यांचेच शिष्य. व्यास हे नंतर राजारामबुवांचे शिष्य झाले. राजारामबुवांनी दक्षिण मुंबईत रागदारी संगीत रुजविण्यासाठी अपार मेहनत केली.
त्यांच्या मंदिरात रात्र रात्र अनेक मैफली चालत. सर्व घराण्यांचे दिग्गज गायक त्यात सहभागी असत. रामभाऊ मराठे, मल्लिकार्जुन मन्सूर. व्यासबुवा यांच्या गायनाला स्वरसाथ करण्याची संधी श्रीपादला मिळत गेली. त्याने या संधीचं सोनं केलं आणि कुमार गंधर्वांपासून पु.लं.पर्यंत सर्वांची वाहवा मिळवली. व्यासांनी तर त्याला आपल्या आयुष्याच्या अखेरच्या घटकेपर्यंत प्रेमाने तालीम दिली.
महाराष्ट्रातल्या गायकांना ‘बुवा ’ असं का संबोधण्यात येतं, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. याबाबत डॉ. अशोक रानडे म्हणत की, याचा संबंध देवालयं आणि कीर्तन परंपरेशी आहे. आजकाल ती उपाधी तितकीशी रुढ नसली तरी श्रीपाद पराडकरांना अनेकजण ‘बुवा ’ म्हणत असत. याच कारण त्यांचा राममंदिराशी असलेला दृढ संबंध. त्यांच्या आवाजात आणि व्यक्तिमत्त्वात हे ‘बुवापण ’ जाणवत असे.
महाराष्ट्राची हिन्दुस्तानी कला संगीताला (आर्ट म्युझिक) देणगी असं नाट्यसंगीत या गीतप्रकाराबद्दल म्हटलं जातं. कला संगीतात जन्मापासून मुरलेला श्रीपाद पराडकर यांच्यासारखा कलाकार नाट्यसंगीताकडे न वळला तरच नवल! श्रीपाद पराडकरांनी अनेक संगीत नाटकांमधून भूमिका समर्थपणे साकार केल्या. शांत आणि सुस्थिर स्वर, संयत आलापी, कसदार तानफिरत आणि एकूण सुघडपणा ही त्यांचा गायनाची वैशिष्ट्यं होती. श्रीपादने वयाच्या पाचव्या वर्षी ‘अमर भूपाळी ’ या चित्रपटालाही ‘घनश्याम सुंदरा ’ ही भूपाळी मान्यवरांसमोर एका समारंभात गायली होती. ती ऐकून त्या चित्रपटाचे निर्माते/दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी श्रीपादला खूष होऊन बक्षीसही दिलं होतं. वडील आणि गुरू राजारामबुवा हे तर जाणते गवई होतेच. पण त्याचे काका आर. एन. पराडकर हे लोकप्रिय भजन गायक होते. ‘दत्त दिगंबर दैवत माझे ’ ही त्यांनी गायलेली रचना सतत आकाशवाणीवरुन प्रसारित केली जात असे.
जुन्या जमान्यातले गवई विद्येच्या बाबतीत अल्पसंतुष्ट नव्हते. एखादा राग शिकून त्यावर मेहनत आणि घोकंपट्टी करून मैफलीत वेळ मारून न्यायची असा त्यांचा शिरस्ता नव्हता. एकेका रागातल्या अनेकानेक बंदिशी कंठगत करून रागांच्या अथांग डोहात अवगाहन करण्यात ते धन्यता मानत. राजारामबुवा याच प्रवृत्तीचे गवई होते. म्हणून संगीतज्ञ श्री. ना. रातंजनकर त्यांना ‘मलुहा पराडकरबुवा ’ म्हणत. हा श्रीमंत वारसा श्रीपाद पराडकरांना लाभला होता. त्यांनी तो जतन केला हे महत्त्वाचं. ‘शास्त्रीय संगीतात रागाची सुरुवात, बंदिशीची मांडणी आणि त्यानुसार बढंत किंवा विस्तार हा त्याचा प्राण आहे. तो सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आणि शिकवणे अत्यंत जरुरीचे आहे’, असं ते नेहमी म्हणत.
या गुणी गायकाला विनम्र आदरांजली.
(लेखक ग्वाल्हेर घराण्याचे गायक व संगीत अभ्यासक आहेत.)








