पुणे : धक्का मारल्याने मोबाइल फुटल्याचा कांगावा करून चौघांनी पादचारी तरुणाला धमकावून त्याच्या खिशातील १२ हजार रुपयांची रोकड हिसकावल्याची घटना सहकारनगरमधील तुळशीबागवाले कॉलनीत घडली. या प्रकरणी चार आरोपींविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनैवर मोजा अन्सारी (वय ३३, सध्या रा. तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) याने तक्रार दिली आहे. तक्रारदार अन्सारी मजुरी करून उदरनिर्वाह करतो. तो महिन्याभरापूर्वी सायंकाळी तुळशीबागवाले कॉलनीतून निघाला होता. मजुरीच्या कामाचे १२ हजार रुपये मासिक वेतन त्याने खिशात ठेवले होते. त्या वेळी चार जणांनी त्याला अडविले. ‘धक्का मारल्याने मोबाइल फुटला असून, भरपाई दे,’ अशी बतावणी करून चौघांनी तक्रारदाराच्या खिशातून रोकड लुटून पोबारा केला. घाबरलेल्या तक्रारदाराने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली.









