अमली पदार्थांवर सुरू असलेल्या कठोर कारवाईचा एक भाग म्हणून स्थानिक प्रशासनाने जम्मू येथे कडेकोट पोलिस बंदोबस्तात एका अमली पदार्थ विक्रेत्याची निवासी मालमत्ता पाडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
पोलिसांच्या पथकाने शक्तिशाली बुलडोझरच्या मदतीने बेलीचरणा येथील ‘शम्सद्दीन उर्फ पप्पी’ याच्या मालकीची मालमत्ता पाडून टाकली. घरासह त्यांनी झोपड्या हटवल्या, काही दुचाकी वाहनेही जप्त केली.
अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आणि सहभागी असलेल्यांचे आर्थिक हितसंबंध उद्ध्वस्त करण्यासाठी, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ११ एप्रिलला १०० दिवसांचे ‘नशामुक्त जम्मू आणि काश्मीर अभियान’ सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणजे ही कारवाई होती, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शम्सदिन हा आर.एस. पुरा येथील सीमावर्ती भागाचा रहिवासी असून, त्याने बेलीचरणा येथे ही मालमत्ता उभारली होती. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात जम्मू विभागात १५०हून अधिक अमली पदार्थ विक्रेत्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत किंवा पाडून टाकल्या आहेत.
प्रशासन तस्करांवर आणि गुन्हेगारी टोळ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करणार आहे. यात त्यांचे पासपोर्ट, वाहन परवाने, आधार कार्ड आणि शस्त्र परवानेही रद्द केले जातील, असे सांगण्यात आले.







