छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यात मंगळवारी वेदान्त लिमिटेडच्या पॉवर प्लांटमध्ये बॉयलरची नळी (ट्यूब) फुटून झालेल्या भीषण स्फोटात किमान ११ कामगारांचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सिंगीतराई गावातील प्रकल्पात हा अपघात घडला. शक्ती जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी सांगितले, की ‘बॉयलर ट्यूबमध्ये हा स्फोट झाला, मात्र त्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या अपघातात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सात जणांनी उपचारादरम्यान जीव गमवला.’
स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलिस पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, बचावकार्य सुरू केले. मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. बॉयलर युनिट देखभालीची जबाबदारी ‘एनजीएसएल’ या उपकंत्राटदार कंपनीकडे होती.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना ५० हजार रुपये दिले जातील.








