डॉ. शीतल मुदबखे यांना पीएच.डी.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

डॉ. शीतल मुदबखे यांना पीएच.डी. मिळाली. प्रा. जगदीश देवरे यांची 'राघवण' कादंबरी प्रकाशित होत आहे. अंबड गावात सहा जनावरे चोरीला गेली. देवळाली कॅम्पमध्ये रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिडकोमध्ये निकृष्ट रस्त्याचे पुन्हा काँक्रिटीकरण सुरू झाले आहे. लाखलगाव येथे गोशाळा, वसतिगृह व सभामंडपाचे भूमिपूजन झाले. या सर्व घडामोडी नाशिक जिल्ह्यात घडल्या आहेत.

डॉ. शीतल मुदबखे यांना पीएच.डी.

नाशिक : सिन्नर येथील सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिराव फुले महिला महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्राध्यापिका शीतल मुदबखे (देवकर) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून हिंदी विषयात आचार्य ( पीएच.डी. ) पदवी संपादन केली. ‘निर्मला चौहान के उपन्यासों में नारी चेतना’ या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. त्यांच्या या संशोधनामुळे महिलांच्या सामाजिक जाणिवांचा नवा दृष्टिकोन समोर आला आहे. संस्थेचे सचिव नामदेव लोणारे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कादंबरीचे प्रकाशन

नाशिक : प्रा. जगदीश देवरे लिखित ‘राघवण’ या प्रदूषण विषयावर आधारित कादंबरीचे प्रकाशन शनिवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. लेखक, गीतकार अरविंद जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. ज्येष्ठ विज्ञानलेखक प्राचार्य डॉ. किशोर पवार, निवृत्त उपविभागीय वनाधिकारी अजित चव्हाणके, मुक्त विद्यापीठाच्या निवृत्त संचालिका डॉ. कविता साळुंके, राजेंद्र देसले उपस्थित राहतील. नवी दिल्ली येथील कौटिल्य प्रकाशनाने ही कादंबरी प्रसिद्ध केली आहे.

सहा जनावरे चोरीला

सिडको : अंबड गावात मध्यरात्री चोरट्यांनी सहा जनावरे चोरून नेल्याची घटना घडली. महालक्ष्मीनगर (हनुमान मंदिराजवळ) येथे राहणाऱ्या नानूबाई बाळू देहाडे यांनी घराशेजारील मोकळ्या जागेत पाच शेळ्या व एक बोकड बांधले होते. रात्री चोरट्यांनी दोऱ्या सोडून ही जनावरे चोरून नेली. सकाळी जनावरे नसल्याचे लक्षात येताच नानूबाई यांनी शोध घेतला, मात्र काहीच पत्ता लागला नाही. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

'पॅचवर्क'चा घाट

नाशिकरोड : देवळाली कॅम्प येथील सहा नंबर नाका ते महालक्ष्मी मंदिर दरम्यान 'पॅचवर्क'चा घाट घातला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला तीन-चार वर्षे पूर्ण होत असतानाच, त्याच ठेकेदाराकडून पुन्हा रस्ता खोदून तिथे काँक्रीटचे थर देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अवघ्या १०० फुटांच्या अंतरात २०-२० फुटांचे दोन मोठे पॅच मारण्यात आल्याने, हे काम नेमके कोणाच्या फायद्यासाठी आणि कशासाठी सुरू आहे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. अवघ्या ३ मीटरच्या रूंद रस्त्याच्या ४५ लाखांचा खर्च केला असल्याचे समजते. नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

पुन्हा काँक्रिटीकरण

सिडको : प्रभाग क्रमांक २८ मधील शुभम पार्क आनंदवननगर येथे आमदार निधीतून दीड किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी रुपये खर्च करूनही निकृष्ट दर्जामुळे अवघ्या महिनाभरातच रस्त्याची दुरवस्था झाल्याचा प्रकार समोर आला होता. रस्त्यावरील खडी व माती उघडी पडू लागल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली होती. शुभम पार्क ते डीजीपीनगर, माउली लॉन्सकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असून येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. निकृष्ट कामामुळे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिकांनी प्रशासनासह आमदार सीमा हिरे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने जुने काम उखडून रस्ता काँक्रीटीकरणास सुरुवात केली आहे.

गोशाळेचे भूमिपूजन

पंचवटी : लाखलगाव (रामाचे) येथे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत गोशाळा, वसतिगृह व सभामंडपासह विविध वास्तूंचे भूमिपूजन झाले. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गोशाळेचे भूमिपूजन झाले. वसतिगृहाचे भूमिपूजन खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले, तर सभामंडपाचे भूमिपूजन आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला द्वाराचार्य महंत महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर, महापौर हिमगौरी आडके, बाळासाहेब सानप, मच्छिंद्र सानप आदी उपस्थित होते.