गोदरेज इंडस्ट्रीज समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून पिरोजशा गोदरेज यांची निवड झाली आहे. पिरोजशा गोदरेज ऑगस्ट महिन्यात त्यांचे काका नादीर गोदरेज यांच्याकडून या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारतील. एका निवेदनानुसार, नियोजित वारसा प्रक्रियेचा भाग म्हणून नादीर गोदरेज ‘चेअरमन एमेरिटस’ (मानद अध्यक्ष) ही भूमिका स्वीकारणार आहेत. या प्रक्रियेत नेतृत्वासह इतर काही बदलही समाविष्ट आहेत.
संपूर्ण उद्योगसमूहाचे अध्यक्षपद ही मोठी जबाबदारी आणि विशेषाधिकार दोन्ही असल्याची भावना पिरोजशा गोदरेज यांनी बोलून दाखवली आहे. पिढ्यानपिढ्यांचा हा मोठा वारसा मला मिळाला असून आपली मूल्ये जपून समूहात भर घालणे, हे माझे काम आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
गोदरेज समूहाकडून यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार, नादीर गोदरेज यावर्षी ऑगस्टमध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त होतील. त्यावेळी ते गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज ॲग्रोव्हेट , गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या संचालक मंडळांतून देखील पायउतार होतील. नादीर गोदरेज यांनी सोमवारपासून ॲस्टेक लाइफसायन्सेसच्या अध्यक्षपदाचा आणि बिगर-कार्यकारी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
पिरोजशा गोदरेज हे नादीर यांचे मोठे बंधू आदी गोदरेज आणि परमेश्वर गोदरेज यांचे सुपुत्र आहेत. ते सध्या नियुक्त-अध्यक्ष असून, १४ ऑगस्टपासून गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारतील. ते गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज कॅपिटल आणि गोदरेज व्हेंचर्सचे अध्यक्ष म्हणूनही कायम राहतील. याखेरीज, नादीर यांचे सुपुत्र बुर्जिस गोदरेज हे गोदरेज ॲग्रोव्हेटचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.





