छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासह पायाभूत सुविधा देण्याचा निर्धार नवीन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अमोल येडगे यांनी केला.
महापालिका अधिकारी - कर्मचारी संघटनेतर्फे मावळते आयुक्त जी. श्रीकांत यांना निरोप देण्याच्या आणि नवीन आयुक्त अमोल येडगे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला महापौर समीर राजूरकर, आमदार संजय केणेकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेता अब्दुल समीर, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, कल्पिता पिंपळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे आदींची विशेष उपस्थिती होती.
या वेळी बोलताना अमोल येडगे म्हणाले, ‘जी. श्रीकांत यांनी केलेल्या कामाची उंची वाढवण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे, ही जबाबदारी मी पार पाडेन. शहराच्या प्रगतीसाठी १२५ नगरसेवकांचा अनुभाव आपल्या सोबत असेल. पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देऊन नागरिकांची पाण्याची अडचण सोडवण्यावर आपला भर राहील.’
जी. श्रीकांत यांनी आठवणींना उजाळा दिला. श्रीकांत म्हणाले, ‘लोक विचारतात तुम्ही मराठवाड्यात किती दिवस अडकून राहणार? या मातीचे माझ्यावर ऋण आहेत, ते फेडण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी विश्वास दाखवून विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी दिली आहे. शहरवासियांना दहा दिवसांनी पाणी मिळते याची मला आयुक्त म्हणून लाज वाटत होती. आता विभागीय आयुक्त म्हणून प्रत्येक घराला नियमित पाणी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’ ‘पुढच्या तीन वर्षांत या शहराचा चेहरामोहरा बदललेला असेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर समीर राजूरकर यांनी जी. श्रीकांत यांनी महापालिकेत केलेल्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. राजूरकर म्हणाले, ‘जी. श्रीकांत प्रशासनातील युजर फ्रेंडली अँड्रॉइड फोन होते. जी. श्रीकांत यांनी शहर विकासाचा पाया रचला.’ ‘अमोल येडगे यांनी आयुक्त म्हणून काम करताना त्यावर कळस चढवावा,’ अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.




