विम्याच्या बहाण्याने उकळले ६२ लाख

महाराष्ट्र टाइम्स

वाशीत एका महिलेला विम्याच्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर टोळीने ६१ लाखांहून अधिक रक्कम उकळली. जुन्या विमा पॉलिसीचा नंबर सांगून विश्वास संपादन केला. पॉलिसी बंद करून भरलेली रक्कम आणि बोनस परत मिळेल असे सांगितले. एजंट कोड, बीटीसी कोड आणि कॅश कन्व्हर्ट करण्याची कारणे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस टोळीचा शोध घेत आहेत.

cyber gang scams woman of 62 lakhs due to lack of precautions

विमा पॉलिसी बंद करून परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका सायबर टोळीने वाशीत राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेकडून सुमारे ६१ लाख ५० हजार रुपये उकळले. सायबर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील ४३ वर्षीय तक्रारदार महिला वाशीमध्ये राहण्यास असून जुलै २०२५ मध्ये सायबर टोळीतील एका सदस्याने एनपीसीआय कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून या महिलेशी संपर्क साधला होता. त्यानंतर या सायबर गुन्हेगाराने महिलेला त्यांच्या नावे असलेल्या जुन्या विमा पॉलिसीचा क्रमांक सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर या टोळीने पॉलिसी बंद केल्यानंतर भरलेली रक्कम आणि बोनस परत मिळेल, असे आमिष दाखवले.

त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी पॉलिसी बंद करून भरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी एजंट कोड' काढणे, बीटीसी कोड काढणे आणि कॅश कन्व्हर्ट करणे अशी वेगवेगळी कारणे सांगितली. तसेच या महिलेचा विश्वास बसावा यासाठी विमा लोकपाल आणि एनपीसीआयचे बनावट लोगो असलेले फॉर्म्स त्यांना ई-मेलवर पाठवले. तसेच या महिलेकडून तब्बल ६१ लाख ४९ हजार ५८० रुपये उकळले. मात्र, दीर्घकाळ उलटल्यानंतर देखील त्यांना कोणतीही रक्कम परत न मिळाल्याने तसेच सायबर गुन्हेगारांकडुन टाळाटाळ होऊ लागल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर या महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.