‘महापालिकेचा कारभार शंभर टक्के ऑनलाइन चालेल. ई - ऑफिसची संकल्पना काटेकोरपणे राबवली जाईल. केवळ सुनावणीच्या फाइलच ऑफलाइन पद्धतीने चालतील,’ अशी माहिती महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
महापालिकेचा कारभार पूर्णपणे ऑनलाइन चालावा. नागरिकांना घरबसल्या सोईसुविधा मिळाव्यात. कामामध्ये पारदर्शकता यावी आणि गतीने कामे पूर्ण व्हावीत या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून ई-ऑफिसची संकल्पना मांडण्यात येत होती, परंतु ती प्रत्यक्षात येत नव्हती. पालिकेतील विशिष्ट यंत्रणा ई - ऑफिसची संकल्पना प्रत्यक्षात येऊ देत नव्हती. पालिका आयुक्तपदावरून नुकतीच बदली झालेले जी. श्रीकांत यांनी ई - ऑफिसची संकल्पना कठोरपणे राबवण्याचा निर्णय घेतला आणि सर्व विभागांसाठी ऑनलाइन कारभार सक्तीचा केला. त्यामुळे प्रलंबित राहणाऱ्या फायलींची संख्या घटली. फायलींचे ट्रॅकिंग करणे सोपे झाले. कोणत्या अधिकाऱ्याकडे किती दिवस फाइल पडून राहिली हे लगेचच लक्षात येऊ लागले. त्यामुळे पालिकेच्या कारभारात पारदर्शकता निर्माण होण्यास मदत झाली.
आयुक्त अमोल येडगे यांनीदेखील ई-ऑफिस प्रणालीवर भर दिला आहे. पत्रकारांशी बोलताना येडगे म्हणाले, ‘पालिकेत ई -ऑफिस प्रणाली शंभर टक्के अंमलात आणली जाईल. एकही फाइल ऑफलाइन चालणार नाही. केवळ सुनावणीच्या फाइल ऑफलाइन पद्धतीने चालवल्या जातील. ज्या अधिकाऱ्यांकडे फायली प्रलंबित राहतात त्या अधिकाऱ्यांकडच्या फायलींवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल.’





