वर्षभराची पाणीपट्टी भरल्यावरदेखील नागरिकांकडून आगावू पाणीपट्टी वसूल करण्यात येत असल्याची प्रकरणे उघड होत आहेत. पालिकेच्या झोन कार्यालयातून हा प्रकार घडत असून या संदर्भात नागरिकांना उघडपणे तक्रार देखील करता येत नसल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेतर्फे घरगुती वापरासाठी अर्धा इंचाचे नळ कनेक्शन दिले जाते, त्याची पाणीपट्टी वर्षाला दोन हजार २५ रुपये आकारली जाते. पाऊण इंच नळ कनेक्शनसाठी तीन हजार २०० रुपये तर एक इंच नळ कनेक्शनसाठी सात हजार ४५० रुपये पाणीपट्टी आकारली जाते. व्यावसायिक नळांना अर्धा इंचासाठी वीस हजार १५० रुपये, पाऊण इंचासाठी ३२ हजार ८०० रुपये आणि एक इंच नळ कनेक्शनसाठी ७४ हजार ५०० रुपये पाणीपट्टी आकारण्यात येत आहे.
नळी नळ कनेक्शनला मंजुरी देताना महापालिका संबंधित नागरिकांकडून एक वर्षाची आगावू पाणीपट्टी भरुन घेते. नागरिकांनी भरलेली ही पाणीपट्टी नळ कनेक्शन घेतल्याच्या तारखेपासून पुढील वर्षी ज्या तारखेला एक वर्ष पूर्ण होते त्या तारखेपर्यंत महापालिकेकडे जमा असते. परंतु असे असताना पालिकेच्या झोन कार्यालयातील कर्मचारी जमा असलेली पाणीपट्टीची रक्कम विचारात न घेता नागरिकांकडून पुढील वर्षाची पाणीपट्टी भरुन घेतात. त्यामुळे नागरिकांचे जास्तीचे पैसे महापालिकेकडे जमा राहतात, त्याचा विचार केला जात नाही. जमा राहणारे जास्तीचे पैसे नवीन वर्षीच्या पाणीपट्टीतून वजा करणे अपेक्षित असताना तसे न करता जमा असलेले जास्तीचे पैसे आणि नवीन वर्षाची पाणीपट्टी पालिकेच्या तिजोरीत भरुन घेतली जाते. पाणीपट्टी वसूलीची ही पध्दत नागरिकांवर अन्याय करणारी असून त्यांची आर्थिक पिळवणूक करणारी असल्याचे बोलले जात आहे.
पाणीपट्टीची चालू वर्षीची मागणी आणि थकबाकी याची सांगड घालण्यासाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी हैदराबाद येथील एका खासगी संस्थेला काम दिले होते. या संस्थेने घालून दिलेल्या पायंड्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.




