रायटींग, नॉट द रॉयटर’ हे वाक्य जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रांत आलेले आहे. फक्त लेखनच नव्हे, तर सगळ्यांच कलांना हे लागू आहे. आस्वादकांनी कलाकार ाला त्याच्या कलेतून बघावे. तो चांगला आहे-नाही, आपल्याला आवडतो-आवडत नाही हे त्या कलाकाराच्या अभिव्यक्तीतून ठरवावे. त्यापलीकडे जाऊन तो दिसतो कसा, काळा की गोरा, भांग डावीकडे पाडतो की उजवीकडे, शाकाहारी आहे की मांसाहारी, विवाहित की अविवाहित असले फाजील कुतूहल लोकांनी बाळगू नये, असे जीएंचे मत होते. थोडा विचार केला तर ते मत पटते. कलाकाराची कला वेगळी आणि त्याचे खासगी आयुष्य वेगळे. कलाकाराचे आयुष्य हे त्याच्या कलाविष्काराचे प्रतिबिंब असावे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. विनोदी लेखन करणाऱ्या लेखकाने जुन्या मराठी नाटकातली विनोदी पात्रे बोलतात तसे सतत विनोदी बोलावे, रहस्यकथा लिहिणाऱ्या लेखकाने घरातही काळा गॉगल, ओव्हरकोट आणि फेल्ट हॅट घालून चिरूट ओढत बसावे, शास्त्रीय संगीताच्या गायकाने बायकोला ‘अहो, अर्धा कप गरम चहा द्या बघू’ हेसुद्धा एखाद्या मालकंसाच्या आरोह-अवरोहाच्या बाजाने म्हणावे असल्या अपेक्षा करणे बालीशपणाचे आहे. याच्या उलटेही चुकीचेच आहे. कलाकाराच्या आविष्कारात लेखकाच्या आयुष्याची प्रतिमा उमटलीच तर ती म्हणजेच लेखकाचे जीवन असे मानू नये. नर्मविनोदी लेखन करणारे चिं. वि जोशी हे त्यांच्या खासगी आयुष्यात धीरगंभीर आणि काहीसे दु:खी स्वभावाचे होते आणि मानवी आयुष्यातील दु:खे, वेदना आणि माणसाची नियतीशरणता यांचे अत्यंत प्रभावी चित्रण करणारे जी. ए. कुलकर्णी हे खाजगी आयुष्यात विविध कलांची जाण असणारे आणि आयुष्याच्या विविध आनंदांची पारख असणारे मर्मज्ञ रसिक होते. त्यामुळे कलाकार वेगळा आणि त्याचे खासगी आयुष्य वेगळे. कलाकाराची कला बघावी, त्यामागचा कलाकार नव्हे, हे सांगताना जीएंनी एक फार चांगली उपमा दिली आहे. ते म्हणतात की, ‘हे असे करणे म्हणजे ताजमहाल बांधण्यासाठीचा संगमरवर इराणमधून आणला, म्हणून ताजमहाल बघण्यासाठी आग्र्याला जाण्याऐवजी इराणच्या खाणी बघायला जाण्यासारखे आहे.’
जीएंनी आपल्या आयुष्यात या ‘खासगीपणा’ला फार महत्त्व दिले. ते ‘खासगीपण’ जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी कायम फटकारून लावले. सुरुवातीचा काही काळ सोडला तर त्यांनी कुणाला आपले फोटोही काढू दिले नाहीत. त्यांचे जवळचे मित्र असलेल्या दळवींनी मुलाखत घेण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवताच जीएंनी तो उडवून लावला. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, सत्कार, साहित्य संमेलने यांपासून ते अगदी दूर राहिले. त्यामुळे त्यांच्याविषयीचे त्यांच्या वाचकांच्या मनांत असलेले कुतूहल दूर झाले नाही; उलट ते वाढलेच. जीएंनी आपल्याभोवती वाचकांच्या मनांत असलेले ‘गूढ’ दूर करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. धारवाडमध्ये असताना जीएंना ‘मराठी साहित्यातला एक प्रमुख लेखक ’ या नावाने ओळखणारे फारसे लोक नव्हते. प्रकृतीच्या कारणास्तव धारवाड सोडून पुण्यात आल्यावरही जीएंनी अनोळखी राहाण्याचा प्रयत्न केला. दळवींनी त्याची यथेच्छ टिंगलही केली. जीएंच्या शेवटच्या आजारातही ते इस्पितळात दाखल झाल्याचे त्यांनी कुणाला कळू दिले नव्हते आणि त्यांच्या मृत्यूचे वृत्तही ते ज्या इस्पितळात भरती होते त्याच्या पलीकडच्या इमारतीत राहाणाऱ्या, ज्यांच्याशी जीएंचे खास मैत्र होते त्या सुनीताबाई देशपांड्यांनाही रेडिओवरील बातमीतून कळले.
जीएंच्या खासगी वस्तू आता कायमस्वरूपी प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत हे वाचल्यावर सर्वांत आधी आठवते ते हे. मराठीतल्या एका श्रेष्ठ लेखकाच्या या खासगी वस्तू म्हणून त्यांना एक भावनिक मूल्य जरूर आहे, पण या वस्तूंमधूनच जीएंचा वेध घेण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर ते जीएंवर आणि त्यांच्या लेखनावर अन्याय केल्यासारखे होईल. जीएंना चष्मा फार तरुण वयात लागला. सुरुवातीला पारदर्शक काचेचा चष्मा वापरणाऱ्या जीएंनी नंतर आयुष्यभर काळ्या काचेचा चष्मा वापरला. त्याच्यामागे काही कारण असलेच तर आता त्याविषयी बोलणे म्हणजे पलीकडे निघून गेलेल्या एका भल्या माणसाच्या आयुष्याबद्दलची आपली फाजील उत्सुकता शमवण्यातला प्रकार आहे. एखाद्याने सतत काळा चष्मा वापरणे यावर खरे तर इतरांनी काही बोलू नये, बोललेच तर फारतर त्या माणसाचा लहरीपणा म्हणून सोडून द्यावे. तरीही जीएंचा काळा चष्मा ही जवळजवळ जीएंची ओळखच होऊन बसली आहे. एका महान लेखकाला अशा एखाद्या प्रतिमेत कोंबून बसवणे इष्ट नाही. कॉलेजमध्ये संपूर्ण साहेबी पोषाख करणाऱ्या जीएंनी टाय आणि टायपिन्स यांची चैन केली. त्या काळातली ती पद्धत होती हे त्याचे एक कारण, आणि जीएंवर त्यांच्या प्रचंड इंग्रजी वाचनातून इंग्रजी वेशभूषेचे काही संस्कार निश्चित झालेले असणार हे दुसरे कारण. त्यामुळे सूट, बूट टाय घातलेले, काळा चष्मा घातलेले, चमचमीत मसालेदार मांसाहारी पदार्थांची आवड असणारे, चहा, खारे दाणे, पोहे आवडणारे, धूम्रपानाचे जबरदस्त व्यसन असणारे जीए- या जीएंच्या प्रतिमेला जीएंचे एक लेखक म्हणून मूल्यमापन करताना काहीच महत्व नाही.
जीए आपल्या लेखनावर प्रचंड मेहनत घेत असत. एकेक शब्द, वाक्प्रचार, शब्दांचे, वाक्याचे व्याकरण, शुद्धलेखन हे बिनचूकच असले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. आपली कथा छापताना तिच्यात एका काडीचाही बदल होणार नसेल तरच ती छापायला ते परवानगी देत असत. एका पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत ‘सूतफेरा’च्या ऐवजी नुसताच ‘फेरा’ असा शब्द आला तेंव्हा त्यांनी तो प्रकाशकाच्या नजरेला आणून दिला आणि तो बदल करायला सांगितला. त्यामुळे त्यांच्या कथा ते दोन-तीनदा हाताने लिहून काढत. ते करत असताना मध्येच पेनातली शाई संपली असे होऊ नये म्हणून ते जाड, भरपूर शाई मावणारी फाऊंटन पेन वापरत असत. वस्तुनिष्ठपणे विचार करायचा झाला तर ती पेन्स महत्त्वाची नाहीत, तर ती वापरुन जीएंनी काय लिहिले ते महत्त्वाचे आहे.
जीएंच्या खासगी वस्तूंचा हा संग्रह बघताना या संग्रहात काय आहे यापेक्षा काय बघायला आवडले असते हा विचार मनाला स्पर्शून जातो. दानय्याने केलेले केशरनागाचे तुकडे, लक्ष्मीच्या स्पर्शाने सोन्याचे झालेले अजगराचे ते कांड, कृष्णेची- कावेरीची ती निळी काकणे, थोडी गोड-थोडी आंबट अशी ती तुती, कमळी म्हणते ती कवठाची चटणी, भैरू पुजाऱ्याला मिळूनही न मिळालेले ते दिव्यदृष्टी देणारे अंजन, तो दाढीवाला माणूस खात असतो ती उसळ-पाव, केळकरांच्या हॉटेलातले पारदर्शक, तपकिरी रंगाचे तुपाने चमकणारे बदामी हलव्याचे चौकोन, गणेशवाडी भटाच्या ताम्हणातली ती तीन शुभ्र अंडी, आत धारदार आसकी मिरची असलेली भजी - असले सगळे बघायला मिळाले असते तर काय बहार आली असती! जीएंना दोन पुस्तके लिहायची होती ती फक्त अर्पण करण्यासाठी. एक पुस्तक त्यांना अर्पण करायचे होते ते सिगारेटला. ‘आनंदात असताना आनंद वाढवणारा, त्रस्त मन:स्थितीत थोडी शांतता देणारा, सल्ला देत सतत किरकीर न करणारा असा तो एक शांत मित्र!’ असे सिगारेटविषयी जीएंनी म्हटले आहे. दुसरे पुस्तक त्यांना अर्पण करायचे होते ते इंग्रजी भाषेला. ही पुस्तके कधी झालीच नाहीत. ही झाली असती तर ती बघायला काय मजा आली असती! ‘तुती’, ‘कैरी’ या कथांप्रमाणेच ‘केळी’ ही तिसरी कथा लिहून जीएंना ते त्रिकूट पूर्ण करायचे होते. ‘केळी’ ही कथा, ‘टायटॅनिक’मध्ये आपल्याकडे जॅकचा एक फोटोदेखील नाही, तो फक्त आपल्या मनात आहे असे रोज म्हणते. ‘केळी’ ही कथा ही या ‘जॅक’ च्या मनातच राहून गेली. ही कथा वाचायला काय मजा आली असती असे वाटते.
असे असले तरीही जीएंच्या संग्रहातले, त्यांनी स्वत: विकत घेतलेले एक पुस्तक उघडून बघताना, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्या हस्ताक्षरात लिहिलेल्या नोट्स हातात घेताना आणि ते नेहमी ज्या खुर्चीत बसत त्या खुर्चीत क्षणभर बसून नंतर लगेच शरमून उठून उभे राहताना माझ्या अंगावर एक कृतज्ञ थरार येऊन गेला हे मला मान्य करावे लागेल. ‘कारट्या, तू बी. ए. हो अगर होऊ नको, पण आतून बाहेरून अगदी दगड हो, अगदी घट्ट, डोंगरी दगड हो बघ!’ असे ‘तुती’ च्या कथानायकाला त्याची आई म्हणते. तसे होणे त्याला जमत नाही. तसे होणे जीएंना जमले नाही, आणि जीएंनी वापरलेल्या या वस्तू बघताना तसे होणे आपल्यालाही जमत नाही असे जीएंच्या वाचकांच्या ध्यानात येते.
(लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत.)




