महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे आणि अतुल कोटेचा यांची नावे घोषित झाल्यानंतर काँग्रेसमध्ये वाद सुरू झाले आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव कमलेश समर्थ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ‘तब्बल ४६ वर्षे मी पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली गेली नाही, नवोदितांना संधी देण्यात आली’, असा आरोप समर्थ यांनी केला आहे.
संघटन सृजन अभियानाअंतर्गत नवा अध्यक्ष कोण असावा, यावरून काँग्रेसमधील दोन गटांत पुन्हा वादावादी झाली.
विद्यमान शहराध्यक्ष विकास ठाकरे समर्थक नगरसेवकांच्या गटाने पुन्हा एकदा ‘ठाकरे यांनाच संधी द्यावी’, अशी आग्रही मागणी केली. तर पक्षातील दुसऱ्या गटाने ‘पुढील अध्यक्ष हा दलित समाजाचा असावा’, असा आग्रह धरला. यावरून दोघांच्याही समर्थकांत वादावादी झाली. त्यामुळे गोंधळ उडाला. उपस्थितांनी वेळीच दोन्ही गटांना आवर घातल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.
गेल्या सहा दिवसांपासून शहराध्यक्ष निवडीसाठी संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. याअंतर्गत रविभवन येथे निरीक्षक अरुण यादव यांनी पक्षाच्या नागपूर महापालिकेतील नगरसेवकांशी चर्चा केली. यावेळी महापालिकेतील ३४पैकी बहुतांश नगरसेवकांनी ‘विकास ठाकरे यांच्याकडेच पुन्हा शहराध्यक्षपदाची धुरा सोपवावी’, अशी मागणी केली. या मागणीवर माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत समर्थक नगरसेवक व पक्षातील ठाकरे विरोधी गटाने आक्षेप घेतला. ‘गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे हेच शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षाने पुढील शहराध्यक्ष हा दलित समाजातून द्यावा’, असे सुचविले. यावर ठाकरे समर्थक नगरसेवक वसीम खान यांच्यासह इतरांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘विकास ठाकरे यांच्या विरोधात ऐकून घेणार नाही’, अशी भूमिका घेत त्यांच्या नावाला विरोध करणाऱ्यांना दटावले. दोन गटांतील या वादावादीमुळे वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, याठिकाणी उपस्थितांनी वेळीच मध्यस्थी करीत हस्तक्षेप केला व दोन्ही गटांना शांत केले. त्यामुळे वाद थोडा शांत झाला. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत गटातून त्यांचे पुत्र कुणाल राऊत यांचे नाव पुढे येत आहे. ठाकरे समर्थकांकडून याला विरोध सुरू आहे.








