‘संसदेत लोकशाहीचा विजय’

महाराष्ट्र टाइम्स

संसदेत महिला आरक्षण विधेयक फेटाळल्यानंतर भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपने काँग्रेसवर महिलाविरोधी असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांनी मात्र, महिला आरक्षणाच्या नावाखाली सत्ता बळकावण्याचा सरकारचा डाव असल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असून, भाजप आपल्या मुख्यमंत्र्यांना विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश देत आहे.

‘संसदेत लोकशाहीचा विजय’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

केंद्रातील भाजप आघाडी सरकारचे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेने शुक्रवारी फेटाळल्यानंतर, सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यातील खडाजंगी शनिवारीही सुरूच राहिली. काँग्रेस महिलाविरोधी पक्ष असल्याचे टीकास्त्र भाजप नेत्यांनी सोडले, तर ‘महिला आरक्षणाच्या नावाखाली सत्ता बळकावण्याचा कट’ रचल्याचा आरोप विरोधकांनी केला.

‘लोकशाहीची हत्या करण्याचा, मतदारसंघांची बेकायदा फेररचना करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडणाऱ्या विरोधकांच्या एकीचा व देशाच्या लोकशाहीचाच संसदेत काल विजय झाला,’ अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वद्रा यांनी हा मनमानीपणा तोंडघशी पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

‘काँग्रेस महिलाविरोधी नाही; उलट महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षणाचे दीर्घकाळापासून समर्थन करत आहे. पूर्वीचे महिला आरक्षण विधेयक लागू करावे, यावर विरोधी पक्षांचे एकमत आहे. मोदी सरकारने ज्या पद्धतीने ते सादर केले आणि लोकशाहीविरोधात जो कट रचला, त्याला आम्ही कधीही पाठिंबा देऊ शकत नाही,’ असे प्रियांका म्हणाल्या.

‘आम्ही २०२३च्या दुरुस्तीला एकमताने पाठिंबा देऊन ती मंजूर केली; परंतु त्याच्या नावाखाली, त्यांनी मतदारसंघ फेररचना कलम समाविष्ट करून दुसरी दुरुस्ती आणली आणि महिला आरक्षण व फेररचना विधेयके एकत्र केली. ही विधेयके एकत्र आणून त्यांना सत्ता बळकावून ठेवायची होती,’ असा हल्लाबोल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

‘विरोधकांकडून विश्वासघात’

भाजपने या घटनेला ‘काळा दिवस’ संबोधून काँग्रेस व इतर विरोधी पक्षांवर महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. ‘काँग्रेस महिलांकडे समान नागरिक म्हणून न पाहता राजकीय साधन म्हणून पाहते,’ असा आरोप माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. भारतीय राज्यघटनेनुसार, लोकसभा किंवा विधानसभा जागांची पुनर्रचना सीमांकनाशिवाय शक्य नाही आणि ते लोकसंख्येवर आधारित असते,’ असे ते म्हणाले. दुसरीकडे, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर हा एक काळा डाग आहे, जो कधीही पुसला जाणार नाही,’ या शब्दांत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वातावरण तापले असून, भाजपने आता थेट विरोधकांविरुद्ध रान उठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी शनिवारी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून या मुद्द्यावर विधानसभेचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत.

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वातावरण तापले असून, भाजपने आता थेट विरोधकांविरुद्ध रान उठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी शनिवारी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून या मुद्द्यावर विधानसभेचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत.