बुलढाणा : पीक परिस्थिती, पाऊस, सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी भेंडवळची घटमांडणी आज रविवार, १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणार आहे. या घटमांडणीचे भाकीत उद्या सोमवार, २० एप्रिल रोजी पहाटे वर्तविण्यात येणार आहे. जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा सुमारे ३५० वर्षांपासून सुरू आहे. भेंडवळची घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. सोमवारी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे भाकीत सांगणार आहेत. पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती , राजकीय भाकीत , असे अंदाज या घटमांडणीतून वर्तविले जातात.








