जहाजांना १२,९८० कोटींचे सुरक्षाकवच

महाराष्ट्र टाइम्स

देशांतर्गत सागरी विमा निधीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे भारतीय जहाजांना आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर विमा संरक्षण मिळेल. परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होईल आणि परकीय चलनाची बचत होईल. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे. रेल्वेच्या विस्तारालाही मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेलाही मुदतवाढ मिळाली आहे.

जहाजांना १२,९८० कोटींचे सुरक्षाकवच
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशसाठी २४,८१५ कोटी रुपयांच्या दोन मोठ्या रेल्वे ‘मल्टी-ट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंजुरी दिली. यामुळे रेल्वेचे जाळे १५ जिल्ह्यांमध्ये ६०१ किमीने वाढेल.

पश्चिम आशियातील तणाव व जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने भारतीय जहाजे व सागरी व्यापाराच्या संरक्षणासाठी १२,९८० कोटी रुपयांच्या सरकारी हमीसह ‘भारत मेरिटाइम इन्शुरन्स पूल (बीएमआय)’ या देशांतर्गत विमा निधीस मंजुरी दिली. भारतीय तसेच भारताशी संबंधित जहाजांना आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर विमा संरक्षण देणे हा या योजनेचा हेतू आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाविषयी पत्रकारांना माहिती दिली. ‘भारत मेरीटाइम इन्शुरन्स पूल हा भारताचा ध्वज असलेल्या तसेच भारताच्या नियंत्रणाखालील जहाजांना लागू असेल. हा निधी १० वर्षांसाठी असेल. यामुळे परदेशी विमा कंपन्यांवरील आपले अवलंबित्व कमी होईल आणि परकीय चलनाची बचत होईल,’ असे मंत्री वैष्णव म्हणाले.

जागतिक पातळीवर अस्थिरता आणि भूराजकीय तणाव वाढल्याने सागरी व्यापारावर परिणाम झाला असून, माल व जहाजांच्या नुकसानीचा धोका वाढल्याने विमा खर्च वाढला आहे. याखेरीज तेलगळती, जहाजांचे अवशेष हटवणे, मालाचे नुकसान, कर्मचाऱ्यांच्या जखमा व पुनर्वसन, धडकविषयक जबाबदाऱ्या इत्यादी जोखमींसाठी भारतीय जहाजे परदेशी विम्यावर अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर, निर्बंध किंवा भूराजकीय तणावामुळे विमा संरक्षण काढून घेतल्यास व्यापाराचे सातत्य आणि सार्वभौमत्व राखण्यासाठी देशांतर्गत सागरी जोखीम विमा निधी आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय, अन्य महत्त्वाच्या निर्णयांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला मार्च २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यासही मंत्रिमंडळाने शनिवारी मंजुरी दिली. यासाठी सुधारित अर्थसंकल्प ८३,९७७ कोटी रुपये आहे.