विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम असून वर्धा येथे तापमान ाने तब्बल ४५ अंश सेल्सियसचा टप्पा गाठला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच शनिवारी प्रथमच तापमान ४५ अंशांवर पोहोचले. इतर जिल्ह्यांमध्येही तापमान चाळिशीच्या वरच राहिल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
नागपुरातील ‘यल्लो ॲलर्ट’च्या पार्श्वभूमीवर शनिवारी कमाल तापमान ४४.२ अंश नोंदवले गेले, तर अकोला ४३.३, अमरावती ४४.०, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४३.२ आणि यवतमाळ ४३.८ अंशांवर पोहोचले. भंडारा आणि गडचिरोलीतही उकाड्याचा जोर कायम आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्री उकाड्याची झळ कमी होत नाही. नागपूरमध्ये किमान तापमान २७.४ अंश, तर वर्ध्यात २७.८ अंश नोंदवले गेले. त्यामुळे उष्णतेचा तडाखा दिवसभर जाणवत असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
राज्याच्या काही भागांत २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यात राज्यातील इतर भागांसह विदर्भातील काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. यात पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर तसेच पूर्व विदर्भात तूर्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही. मात्र, विदर्भातील पावसाळी स्थितीमुळे तापमानात काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.








