डेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण कालच पार पडला. कुठलाही सण रविवारी आला, की आमची अर्धशिशी डोकं वर काढते. हक्काची सुट्टी जाते हो! त्यामुळं यापुढं कुठलाही सण रविवारी आल्यास सरकारनं दुसऱ्या दिवशी, म्हणजे सोमवारी सुट्टी द्यायलाच हवी. तर ते एक असो. काल तर वेगवेगळ्या कारणांनी आम्ही डोकं धरून बसलो होतो. एक तर पारा कितीही वर चढला, तरी मॉर्निंग वॉक हा करायचाच, असा आमचा एक दृढ निश्चय असतो. आमची सकाळ साधारण नवास सुरू होते. काल सकाळच्या पारी पारा चाळिशीकडं चालला असतानाही आमचा पन्नाशीकडं चाललेला देह आम्ही महत्प्रासानं सोसायटीच्या ट्रॅकवर आणला. रविवार आणि त्यातही सण असल्यानं ट्रॅक मोकळाच होता. एरवीपेक्षा अर्धीच फेरी मारायची असं आधीच ठरलं होतं. मात्र, ती फेरी पूर्ण होता होताच आम्हाला फेरा आला. मटकन खालीच बसलो. सोसायटीत चार लोक आम्हांस ओळखतात. (ती ओळख येथे सांगणे बरे नव्हे.) त्यांनी नीट घरी आणून सोडलं म्हणून बरं. आता आमची अर्धशिशी पूर्ण तेजानं तळपू लागली. अशा बिकट प्रसंगी आमच्या अर्धांगानं सोनेखरेदीचा विषय काढला. वास्तविक गेल्या कित्येक अक्षय्य तृतीया अशा आल्या आणि तशा गेल्या. आम्ही क्वचितच या मुहूर्तावर सोने खरेदी केली. त्यातच गेल्या काही दिवसांत सोन्याचे वाढलेले भाव पाहून झोप उडाली होती. त्यामुळंच आम्ही सोन्याचा विषय टाळत होतो. मात्र, आपल्या घरात माप ओलांडून आलेलं सौभाग्य आपल्याला या गोष्टी कधीही विसरू देत नाही. त्यामुळं आम्ही अर्धशिशीनं धरलेलं डोकं आणि २० दिवसांत अर्धं झालेलं पाकीट घेऊन अगदी ओढगस्तीला आल्यासारखं बाहेर पडलो. सराफांच्या दुकानांत मंडईसारखी गर्दी लोटली होती. लोक निर्लज्जासारखे त्या पिवळ्या धातूच्या मागं लागले होते. आम्ही केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेस हातभार म्हणून स्वत:स त्या गर्दीत लोटले आणि अर्धं पाकीट पूर्ण रिकामं करून तब्बल अर्धा ग्रॅम सोनं पदरात पाडून घेतलं. कालच्या मुहूर्तावर बऱ्याच गोष्टी अर्ध्यामुर्ध्या झाल्या तरी एक गोष्ट मात्र ‘पूर्ण’ झाली होती - ती म्हणजे खरेदीचा अक्षय्य आनंद! - चकोर










