मातृसेवा संघ ही पारतंत्र्याच्या काळात स्थापन झालेली संस्था आहे. त्यावेळी भारतीय महिलांना इंग्रजांच्या रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी जाता येत नसे. ही बाब हेरून कमलाताई होस्पेट यांनी मातृ सेवा संघाची स्थापना केली. शतकानंतरही अव्याहतपणे सुरू असणाऱ्या या कार्यातील सेवाभाव तसूभरही कमी झालेला नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मातृसेवा संघाचा १०५वा वर्धापनदिन व प्रसविका प्रशिक्षण केंद्राच्या शताब्दी वर्षात पदार्पण महोत्सवाचा शुभारंभ या रविवारी झालेल्या संयुक्त कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अरुणा बाभुळकर, सचिव डॉ. लता देशमुख, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, उपाध्यक्षा रश्मी भावे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. पुष्पा भावे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, मातृसेवा संघात महिलांसाठी निरनिराळे उपक्रम चालविण्यात येतात. पण, शतकानंतर आजदेखील त्यात व्यावसायिकता आलेली नाही. अजूनही स्वयंसेवी संस्था म्हणूनच काम सुरू आहे. प्रसविका केंद्राच्या नव्या इमारत उभारणीतदेखील आम्ही सहकार्य करू, असा विश्वास व्यक्त केला.
महापौर नीता ठाकरे यांनी, नागपुरात सुतिकागृहाप्रमाणेच परगावाहून येणाऱ्या महिलांसाठी निवास व्यवस्था आवश्यक आहे. मनपातर्फे ही सोय करण्याची गरज असल्याचे सांगितले.
दीपप्रज्वलन व चैत्रगौरीच्या पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थापिका कमलाताई होस्पेट आणि वेणूताई नेने यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. प्रास्ताविकात सचिव डॉ. लता देशमुख यांनी संस्थेच्या कार्याची वाटचाल सांगितली. तसेच, शताब्दी वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रसविका प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या शताब्दी वर्षातील पदार्पणाचा ऑनलाइन शुभारंभ व वृक्षारोपण मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन यशश्री वाघ यांनी केले व आभार मानले. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.









