हिमनद्यांचा ऱ्हास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जगभरातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. २०२५ पर्यंत हिमनद्यांनी मोठे वस्तुमान गमावले आहे. यामुळे समुद्राची पातळी वाढली आहे. मागील सात वर्षांत सहा वेळा हिमनद्या वितळण्याचे प्रमाण सर्वाधिक नोंदवले गेले. हिमालयातील हिमनद्या सुमारे दोन अब्ज लोकांसाठी पाण्याचे स्रोत आहेत. जागतिक तापमानवाढ थांबवणे आवश्यक आहे.

हिमनद्यांचा ऱ्हास

गभरातील हिमनद्या वेगाने आणि अधिक प्रमाणात वितळत आहेत. सन २०२५मध्ये हिमनद्या वितळल्याने त्यांनी ४०८ गिगाटन वस्तुमान गमावले. हे वस्तुमान समुद्राच्या पाण्याच्या पातळीत १.१ मिलीमीटर वाढीस कारणीभूत ठरण्याइतके आहे, असा निष्कर्ष एका ताज्या अभ्यासात काढण्यात आला आहे.

मागील सात वर्षांचा विचार करता, सहा वर्षांमध्ये हिमनद्या वितळण्याची सर्वाधिक नोंद झाली आहे. यासंदर्भात ‘नेचर रिव्ह्यूज अँड एन्व्हायर्नमेंट’ या शोधपत्रिकेत शोधनिबंध प्रसिद्ध झाला असून, हिमालयातील हिमनद्यांमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

हिमनद्या वितळण्याचे प्रमाण कॅनडा, अमेरिका, आइसलँड, मध्य युरोप येथे यंदाच्या वर्षी सर्वाधिक होते. पश्चिम कॅनडा, अमेरिका, दक्षिण आशियाचा पश्चिम भाग येथे हे प्रमाण १९९१ ते २०२० या कालावधीच्या सरासरीपेक्षा अधिक होते. आशियातील पर्वतरांगा, अलास्का, रशियन आर्क्टिक येथे अनेक हिमनद्यांवर परिणाम झाला. हिमालयातील हिमनद्या सुमारे दोन अब्ज लोकांसाठी पाणी देतात. हिमालयामधील हिमनद्यांच्या स्थितीवर अधिक चांगल्या पद्धतीने नजर ठेवली जात असल्याचे या शोधनिबंधाचे सहलेखक मायकेल झेंप यांनी सांगितले, पण याची व्याप्ती अजूनही मर्यादित आहे. या निरीक्षणांच्या आधारे भविष्यातील धोक्यांचा अंदाज येऊ शकेल, असे या शोधनिबंधाचे सहलेखक मोहम्मद फारुक आझम यांनी सांगितले.

अवघ्या दोन दशकांपूर्वी १९७६ ते १९९५ या कालावधीमध्ये हिमनद्या प्रतिवर्ष १०० गिगाटन वस्तुमान गमावत होत्या. काही वेळा हे वस्तुमान वाढलेही होते. पण १९९६ ते २०१५ या काळात हे प्रमाण प्रतिवर्ष ३९० गिगाटनपर्यंत पोहोचले. १९७५पासून एकूण हिमनद्यांनी एकूण नऊ हजार ५८३ गिगाटन वस्तुमान गमावले आहे. हे समुद्रपातळीमध्ये २६.५ मिलीमीटर वाढीइतके मोठे आहे. गेल्या सात वर्षांमधील सहा वर्षांमध्ये सर्वाधिक प्रमाणात हे वस्तुमान गमावल्याचेही या शोधनिबंधात स्पष्ट केले आहे. हा धोका लक्षात घेऊन जागतिक तापमानवाढ थांबवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर याचे विपरित परिणाम हिमनद्यांच्या परिसरातील दैनंदिन जीवनावर होऊ शकतात.

- टीम मटा