वळवातील वाळवी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गेल्या आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसानंतर, शहरात आणि ग्रामीण भागात वाळवीचे थवे उडताना दिसले. जमिनीखालील वसाहत पूर्ण झाल्यावर नवीन घरट्यासाठी हे कीटक बाहेर पडतात. मात्र, तापमानातील चढउतार आणि कडक ऊन यामुळे त्यांच्या जगण्यावर संकट आले आहे. हवामान बदलाचा त्यांच्या जीवनचक्रावर परिणाम होत आहे. हे कीटक निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाचे आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

वळवातील वाळवी

ज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर, दोन-तीन दिवस रोज संध्याकाळी असंख्य कीटकांचे थवे उडताना दिसले. उडणारी वाळवी (टर्माइट ) हे या कीटकांचे नाव. त्यांना वळवाच्या किंवा मान्सूनपूर्व पावसातील पाहुणे असेही म्हटले जाते. निसर्गाच्या अन्नसाखळीत त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. या वाळवीची जमिनीखाली मोठी वसाहत असते. या वसाहतीची क्षमता पूर्ण झाली की, नवीन वसाहत स्थापण्यासाठी पंख असलेले नर आणि मादी किडे मोठ्या संख्येने बाहेर पडतात. याला शास्त्रीय भाषेत ‘स्वार्मिंग’ म्हणतात.

वळवाचा पाऊस जमिनीला स्पर्श करतो, तेव्हा मिळणाऱ्या ओलाव्याच्या संकेतामुळे ते बाहेर येतात. मातीही भुसभुशीत होते. मुसळधार पावसानंतर जमिनीतील ओलावा वाढतो, हवेत आर्द्रता निर्माण होते. हे वातावरण त्यांना उडण्यासाठी, नवीन घरटे तयार करण्यासाठी आणि मिलनासाठी पूरक असते.जमिनीवर आल्यावर नैसर्गिकरीत्या ते रस्त्यावरील दिव्यांकडे आकर्षित होतात. याच काळातील त्यांचे मिलन आणि प्रजनन होते. मिलनानंतर त्यांना नवीन वसाहत तयार करण्यासाठी, अंडी घालण्यासाठी मातीमध्ये ओलावा आणि हवेत गारवा आवश्यक असतो. मात्र सध्या तापमानातील लक्षणीय चढउतार हे या कीटकांसाठी मोठे संकट ठरले आहे. वळवाच्या पावसानंतर लगेच पडणारे कडक ऊन या नाजूक किड्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहे. हवामान बदलाचा या कीटकांच्या जीवनचक्रावर, नैसर्गिक परिसंस्थेवर होत असलेल्या बदलांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे, असे कीटकतज्ज्ञ डॉ. हेमंत घाटे सांगतात.

हे कीटक दशकानुदशके शहरात-ग्रामीण भागात जमिनीखाली राहत आहेत. हे किडे अनेक पक्षी, वटवाघळे, पाली, बेडकांसाठी प्रथिनांचा मुख्य स्रोत आहेत. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवून माती सुपीक करण्याचे काम ते करतात. मात्र, शहरांमध्ये उष्णता बेट प्रमाण (हीट आयलंड इफेक्ट) अधिक असल्याने हे कीटक दिव्यांकडे जास्त आकर्षित होतात. वाढते काँक्रीटीकरण आणि जमिनीत ओलावा टिकून न राहिल्याने त्यांना जगण्यासाठी संघर्षही करावा लागतो आहे, आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

- चैत्राली चांदोरकर