भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने रविवारी स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचा प्रारंभ आग्याराम देवी मंदिर येथे भगवान परशुरामाच्या विधिवत पूजनाने झाला. या रॅलीचे मुख्य आकर्षण भगवान परशुरामांचा भव्य आणि देखणा रथ होता. रॅलीमध्ये सहभागी झालेले टाळकरी आणि मंगलवाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून आणि जल्लोषात या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
आग्याराम देवी मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली दत्त मंदिर, आसरा देवी मंदिर, श्री गणेश मंदिर, थाडेश्वरी राम मंदिर, चिटणीस पार्क चौक, बडकस चौक, गजानन महाराज मंदिर, आयाचित मंदिर, भोसला वेद शाळा, झेंडा चौक, रेशीमबाग चौक आणि स्मृती मंदिर मार्गे मार्गक्रमण करीत हनुमाननगर मैदानावर विसर्जित झाली. मार्गावरील प्रत्येक चौकात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. या सोहळ्याला आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके आणि भाजप नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीच्या आयोजनासाठी महासंघाचे अध्यक्ष पराग जोशी, संयोजक तुषार पिदडी, सहसंयोजक श्रद्धा पाठक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रॅलीचा समारोप महाआरती आणि महाप्रसादाने करण्यात आला.









