एकतारा आणि वीणा

Contributed by श्रीधर नांदेडकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एकतारा आणि वीणा गळे प्रवाह एकत्र येतात. भक्तीतील व्याकुळता दूरच्या तीर्थयात्रा घडवते. नामदेवराय घुमानला पोहोचल्यावर नामदेवबाबा होतात. बाउल पंथाची कर्मभूमी पश्चिम बंगालच्या खेड्यापाड्यात विखुरलेली आहे. लालन फकीर यांनी पाच हजार भक्ती गीतांची रचना केली. पूर्णदास बाउल यांनी बाउल संगीताला पाश्चात्त्य जगात ओळख मिळवून दिली. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांना बाउल संगीतानं झपाटून टाकलं होतं. बाउल फार साधं जीवन जगतो.

एकतारा आणि वीणा

गळे प्रवाह एकत्र येतात. सगळ्या वाटा अखेर एकाच मुक्कामी पोहोचतात. भक्तीतील व्याकुळता दूरच्या तीर्थयात्रा घडवते. नामदेवराय घुमानला पोहोचल्यावर नामदेवबाबा होतात. भक्तीचा जागर आणि मानवतेचा संदेश देत भजन, कीर्तन, प्रवचन करत किती यात्रा झाल्या असतील. आपल्या भूमीत उपासनेच्या, प्रार्थनेच्या, आराधनेच्या, किती विविधांगी पद्धती आहेत. शेवटी सगळे प्रवाह एकत्र येतात. एकीकडे वारकऱ्यांची वीणा झंकारते आणि विठूमाउलीचा गजर होतो. तिकडे दूरवर एकतारा घेऊन बाउल गिरकी घेतो आणि हरिभक्तीचं दैवी संगीत जन्माला येतं. बाउल पंथाची कर्मभूमी पश्चिम बंगालच्या खेड्यापाड्यात विखुरलेली. बाउल म्हणजे तंद्रीतला यात्रिक. दैवी प्रेरणेचा धनी. संत आणि कवी. नामस्मरणात संपूर्ण जीवन व्यतीत करणारा योगी. महाचैतन्यप्रभूंपासून ही अद्भुत संत परंपरा सुरू होते. आणि लालन फकीर बाउल पंथाचे उद्गाते होऊन पाच हजार भक्ती गीतांची रचना करतात. मौखिक परंपरेने आजतागायत त्या रचना जतन केल्या आहेत. पूर्णदास बाउल यांनी बाउल संगीत ाला पाश्चात्त्य जगात ओळख मिळवून दिली. लोकसंगीताचा बाज घेऊन बाउल संगीत सामान्य कष्टकरी माणसांच्या आनंदाचा स्त्रोत झालं आहे. काळाच्या ओघात या पंथात काही सकारात्मक आणि काही नकारात्मक परिवर्तन झालं; परंतु आजही बंगाली माणसाचं बाउल संगीताविषयीचं प्रेम कमी झालेलं नाही. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांना बाउल संगीतानं झपाटून टाकलं होतं. बाउल संगीत आपलं तत्त्वज्ञान उत्स्फूर्त भक्तीआवेगातून व्यक्त करतं. वैष्णवांच्या परंपरांशी साधर्म्य सांगत, एकोप्याची, समत्वाची, प्रेमाची, माणुसकीची कास धरत आणि मानवतेचा संदेश देत हा पंथ एकोणिसाव्या व विसाव्या शतकात खूप प्रसिद्ध झाला. बाउल फार साधं जीवन जगतो. भजन गात राहायचं आणि भूक भागेल इतकच अन्न भिक्षेत मागायचं. झोपडीत राहायचं. गळ्यात तुळशीची माळ. सोबत एकतारा आणि डुगी. पायात मंजुळ घुंगरांची माळ. भारताच्या विविधतेचं ओजस्वी रूप बाउल परंपरेत तंतोतंत दिसतं. वारकरी संप्रदायात भेदाभेद अमंगळ, तसा बाउल पंथात ना जात ना धर्म. आत्मरूप म्हणजेच देव. काळजातला अंतरात्मा म्हणजे ‘मोनेर मानुष.’ गुरू अंतरात्म्याकडे घेऊन जातो ही श्रद्धा. कामगारांच्या वस्तीत बालपणी अनुभवलेला एकोपा, प्रेम आणि जिव्हाळा आठवतो आणि बाउल मला अधिकच आपलासा वाटतो.