क्रमवारीपल्याडचे वास्तव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जागतिक आर्थिक क्रमवारीत भारत सहाव्या स्थानी घसरला आहे. ब्रिटनने भारताला मागे टाकत पाचवे स्थान मिळवले आहे. मात्र, ब्रिटनचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा वीसपट अधिक आहे. जीडीपी वाढीचा वेग चांगला असला तरी दरडोई उत्पन्न वाढणे अधिक महत्त्वाचे आहे. या क्रमवारीत भारत तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी पोहोचू शकतो, पण दरडोई उत्पन्न वाढीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

क्रमवारीपल्याडचे वास्तव

खाती युद्धाची धुमश्चक्री, त्यातील अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेसुमार कोलांटउड्या आणि आपल्याकडील महिला आरक्षण विधेयकावरील राजकारण या सगळ्या गदारोळात एक बातमी थोडी दुर्लक्षित राहिली. अर्थव्यवस्थेच्या जागतिक क्रमवारीत भारताची चौथ्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झालेली घसरण ही ती बातमी. त्यातही ब्रिटनने आता पुन्हा भारताच्या पुढे, पाचवे स्थान मिळवले, ही या बातमीतील भारतीयांना सलणारी बाब. याचे कारण अर्थातच, ‘ब्रिटनवरील विजय’ किंवा ‘ब्रिटनविरुद्धचा पराभव’ हा भावनिक दृष्ट्या भारतीयांसाठी महत्त्वाचा मुद्दा! आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘जागतिक आर्थिक अनुमाना’नुसार (वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक) ४.२६ ट्रिलियन डॉलर जीडीपीचा ब्रिटन जागतिक आर्थिक क्रमवारीत पाचव्या स्थानी, तर ४.१५ ट्रिलियन डॉलर जीडीपीचा भारत सहाव्या स्थानी विराजमान झालेला आहे. अमेरिका, चीन, जर्मनी व जपान ही या क्रमवारीतील पहिली चार राष्ट्रे. सध्याच्या युगात, ‘पहिल्या अमुकांत’ ही संज्ञा महत्त्वाची. त्यास अनुलक्षून भारत आता ‘पहिल्या पाचां’त उरलेला नाही. सकृतदर्शनी ही बाब भारतीयांना खट्टू करणारी असली तरी त्याकडे वास्तवाच्या चष्म्यातून पाहायला हवे. मुळात जीडीपीमध्ये ही घट होण्यास कारणीभूत आहे तो डॉलरच्या तुलनेत अशक्त झालेला भारतीय रुपया आणि जीडीपी मोजण्यासाठीच्या ‘बेस इअर’मध्ये झालेला बदल. प्रत्यक्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सध्याचा आणि अंदाजित वेगही चांगला आहे. हा वेग ६ ते ६.९ टक्के या दरम्यान राहील, असा रिझर्व्ह बँकेसह जागतिक बँक, आशियाई विकास बँक यांचा अंदाज आहे. त्याचवेळी ब्रिटनसाठीचा हा अंदाजित वेग आहे ०.८ ते १.१ टक्के. खुद्द नाणेनिधीने देखील ‘भारताची ही घसरण फारशी गंभीर बाब नाही’, असा निर्वाळा दिलेला आहे. त्यामुळे या सहाव्या क्रमांकाने भारतावर आकाश कोसळले असे होत नाही, हे निश्चित. मात्र त्याचवेळी या क्रमवारीच्या पल्याडचे एक ठळक वास्तव ध्यानात घ्यायला हवे. ज्या ब्रिटनने आपल्याला क्रमवारीत मागे टाकले आहे त्या ब्रिटनचे दरडोई वार्षिक उत्पन्न आहे ६१ हजार डॉलर आणि भारताचे दरडोई उत्पन्न आहे २८१३ डॉलर. हा फरक जवळपास वीसपट आहे. पुढच्या काही काळात आपण जीडीपीच्या हिशेबात चौथ्याच काय, तिसऱ्याही स्थानावर जाऊ शकू; पण त्यापेक्षा महत्त्वाचे आहे ते आपले दरडोई उत्पन्न समाधानकारकरीत्या वाढणे. मथळ्यांत झळकणाऱ्या क्रमवारीपेक्षा त्याचे मोल अधिक, हे साऱ्यांनीच जाणणे महत्त्वाचे.



क्रमवारीपल्याडचे वास्तव