पेरणी आणि उगवण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

निवृत्तीनंतरही शिक्षिकेने मुलांशी संवाद साधण्याचा मार्ग शोधला. त्यांनी मैत्रिणींसोबत मिळून शाळांमध्ये संस्कार वर्ग सुरू केले. कथाकथन, खेळ आणि नाट्य यातून मुलांना आनंद दिला जातो. या उपक्रमातून शिक्षिकेलाही समाधान मिळते. मुलांच्या सजग पालकांशी संवाद साधून आनंद वाढतो. निसर्गाप्रमाणेच जीवनातही आनंदाचे बीज पेरल्यास फळ मिळते.

पेरणी आणि उगवण

फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का?’ हेडफोनवर गाणं ऐकत कोवळ्या सोनपिवळ्या उन्हाचा वर्षाव अनुभवणं चाललं होतं. रविवारची सकाळ लेकीसोबत टेकडीवर भ्रमंती करायची असा आमचा अलिखित नियम आहे. कानावर पडणाऱ्या पक्ष्यांच्या गोड चिवचिवाटाबरोबर मनात विचारांचा गुंजारव सुरू झाला. सध्याची निवृत्त मी आणि कालची कार्यरत मी, अशा आम्ही एकमेकींशी हितगुज करायला लागलो.

अनेक वर्षं केलेली नोकरी, त्यामुळे नेहमीच गतिशील दिनक्रम होता. वेळेचं कितीही नियोजन केलं तरी धावपळ पाचवीला पूजलेली होती. अगदी सुट्टीच्या दिवशीही वेळापत्रकाचं काटेकोरपणे पालन करावंच लागायचं. मग निवृत्त झाल्यावर काय? असा प्रश्न पडला. पूर्वीप्रमाणे मागच्या पानावरून पुढे तर जायचं नव्हतं. आता नेमकं नव्याने नियोजन कसं आणि काय करावं, असा प्रश्न समोर आला. मनापासून आवडीचा शिक्षकी पेशा निवडला होता. मूर्तिमंत चैतन्याचा सहवास भरभरून मिळत होता. दैनंदिन शालेय कामकाज, अध्यापन वगैरेच्या जोडीला सहल, वाचन, नाट्य, विविध सहशालेय उपक्रमात रमले होते. माझ्या दृष्टीने जणू ‘नित्य नवा दिस जागृतीचा’ असायचा. या ना त्या कारणाने मुलांशी प्रत्यक्ष संवाद, सहवास याची सवय लागून गेली होती. यामुळे आनंद भरभरून मिळायचा. दिवस कधी उगवला आणि मावळला, हे पण समजायचं नाही. बरीच वर्षं घर आणि शाळा असं ‘स्विच ऑन स्विच ऑफ’चं ट्युनिंग सरावानं छान जमून गेलं होतं.

पेरणी आणि उगवण

पेरणी आणि उगवण

निवृत्ती म्हणजे अल्पसा विराम, एक नवी सुरुवात..असं बरेचदा ऐकलं होते; पण यातला खरा अर्थ समजला नव्हता. सहली, वाचन वगैरे यात स्वतःला रमवून घेण्याचा प्रयत्न करत होते, तरी पण सिग्नलला करकचून ब्रेक लागून गाडी थांबावी तसं काहीसं वाटत होते. वाचन आणि थोडं फार लेखन करणं यांसोबत जुना स्नेह होता. गोष्टी सांगणे, कविता, स्तोत्र म्हणणे शाळेमुळे सवयीचं झालं होतं. म्हणून ठरवलं की आता आपल्या घराजवळच्या परिसरात शाळा आणि मैदानं आहेत तिथे जाऊन सांगायचं की तुमच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांसाठी थोडा वेळ येऊन त्यांच्याशी गप्पागोष्टी करायला आवडेल. याप्रमाणे आम्ही काही समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन संस्कार वर्गाचा उपक्रम परिसरातल्या शाळांमध्ये जाऊन सुरू केला. मनापासून सेवा केली की मेवा मिळतो, असं म्हणतात. म्हणूनच की काय कथाकथन, खेळ वर्ग, स्पर्धा परीक्षण, व्याख्यानमाला अशा वेगवेगळ्या निमित्तानं पुन्हा एकदा शाळा, बालभवन यांच्याशी जोडणं झालं. आताशा हे नवीन रूटीन चांगलं अंगवळणी पडलंय, म्हणून मनातून खुश झाले आणि स्वतःला शाबासकी देऊन टाकली.

तेवढ्यात कन्येने ‘आई, आई’ म्हणून भानावर आणलं. टेकडीवर झाडाझुडपांच्या आसपास मोर दिसतात, तसा दिसला की काय, असं मी तिला विचारलं. त्यावर ती हसून म्हणाली, ‘ आई, मोर नाही पण ते हसरं पोर ‘ताई, ताई...’ म्हणून मगापासून बहुतेक तुलाच हाक मारतंय.’ प्रश्नार्थक नजरेनं त्या दिशेला पाहिलं तर नऊ-दहा वर्षांचा चुणचुणीत मुलगा घाईघाईनं आला. त्याच्या आई-वडिलांना, ‘या आमच्या टीचर आहेत’, अशी ओळख करून दिली. ‘माझी आई तर मोठ्या मुलांना शिकवायची,’ असं त्याला कन्या म्हणाली. त्यावर ‘होय का, पण आता तर या आणि त्यांच्या बरोबरच्या ताई आमच्या शाळेत आठवड्यातून एक दिवस संस्कार वर्ग घ्यायला येतात. गोष्टी, गाणी आणि खेळ, नाटक अशी आम्ही सगळे मिळून धमाल करतो,’ असं तो सांगू लागला. त्याच्या वडिलांनी सांगितलं, ‘हा दर रविवारी टेकडीवर मोरांना खायला द्यायला त्याच्या डब्यातून धान्य घेऊन येतो. मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आणि त्याचे तीनचार मित्र छोट्या कॅनने पाणी आणून इथल्या झाडांना घालत होते.’ अंधारावर रुसणाऱ्या नव्या जगाच्या नव्या दमाच्या त्या गुणी चुणचुणीत मुलाशी आणि त्याच्या सजग पालकांशी बोलून भरभरून आनंद मिळाला.

शाळेत पेरलेल्या आनंदाच्या छोट्या बीजाचे रोप होऊ लागले होते. चार साळभात पेरले की चारपाचशे दाणे मिळतात... निसर्ग कुणाचं देणं ठेवत नाही. हाच नियम जीवनातल्या आनंदालाही लागू पडतो.

- सुचरिता पोरे, पुणे