कूलरच्या करंटने प्रभारीव्यवस्थापकाचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भंडारा येथे कूलरचा करंट लागून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभारी व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. गोंदियात जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याची हत्या झाली असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर कारवाई करत तीन जणांना पकडले. पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे.

death of agricultural manager due to cooler electric shock

भंडारा : अड्याळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी व्यवस्थापक मोहित हटवार (कोंढा) यांचा सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कूलरचा करंट लागून मृत्यू झाला. सायंकाळी हटवार हे कूलर सुरू करीत असताना त्यांना अचानक करंट लागला. हा धक्का जोरदार होता की ते जागीच कोसळले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

बुट्टीबोरीतून सहा अटकेत

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील मलपुरी येथील उसेन सेवकराम रहांगडाले या शेतकऱ्याचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिस तपासात जमिनीच्या जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी एका विधिसंघर्षित बालकासह सहा आरोपींना नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथून अटक करण्यात आली आहे. राहुल जगराम कुंभरे (२३) रा. हनोतिया (छिंदवाडा), करण जगदिश नर्रे (२४), अभिषेक फुलनसा नर्रे (१९) दोन्ही रा. पटनिया (जुन्नारदेव जि. छिंदवाडा) व मयारी येथील एका विधिसंघर्षित बालकाचा अशी आरोपींची नावे आहेत.

क्रिकेट सट्ट्यावर छापा

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील राजुरा येथील ऑनलाइन क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. महेश पाटकर (३४), अभिजीत पेटकर (३६) आणि सागर निंबार्ते (३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यावर ‘फाइन एक्स्च’ आयडीद्वारे सट्टा लावला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी नऊ मोबाइल, दोन लॅपटॉप व अन्य साहित्य असा एकूण सुमारे ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.