जात प्रमाणपत्र वाद हे षड् यंत्र

महाराष्ट्र टाइम्स

मुंब्र्याच्या एमआयएम नगरसेविका सहार शेख यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेला वाद विरोधकांचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. समाज माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चा खोट्या असून विरोधकांनी प्रशासनाशी संगनमत करून हा बनाव रचल्याचा आरोप त्यांनी केला. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचाही यात हात असल्याचे त्या म्हणाल्या. याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

caste certificate controversy is it an opposition conspiracy against the aimim councilor

मुंब्र्यातून ‘एमआयएम’ पक्षाकडून निवडून आलेल्या नगरसेविका सहार शेख यांनी, त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेला वाद विरोधकांचे षड् यंत्र असल्याचा दावा सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केला. शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर सुरू होत्या. या सर्व वावड्या खोट्या असून विरोधकांनी प्रशासनाशी संगनमत करत हा बनाव रचल्याचा आरोप शेख यांनी केला.

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंब्र्यात ‘एमआयएम’ने जोरदार मुसंडी मारत पाच जागांवर विजय मिळवला. यामध्ये प्रभाग क्र. ३० (ब)मधून सहार शेख यांनी विजय नोंदवला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून वाद सुरू होता. शेख यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी याबाबत आक्षेप नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर शेख यांचे नगरसेवकपद रद्द होणार, अशीही चर्चा सुरू होती. त्यानंतर शेख कोणाच्याही संपर्कात नसल्याचा दावा करण्यात आल्याने हे प्रकरण अधिकच चिघळले. त्यामुळे त्यांनी ठाण्यात जाहीर पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांचे वडील युनूस शेख यांनी कुटुंबामधील प्रत्येकाचे जात प्रमाणपत्र व इतर कागदपत्र सादर केली. आमची सर्व कागदपत्र वैध असून विरोधकांनी माझ्या मुलीच्या विजयानंतर धसका घेतला आहे. त्यामुळेच हा बनाव सुरू असल्याचे युनूस शेख यांनी सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांचा हात

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा या प्रकरणात हात आहे. त्यांनी प्रशासनाला हाताशी धरत हा कांगावा केला असून, याविरोधात न्यायालयातही धाव घेणार असल्याचे शेख यांनी यावेळी नमूद केले.