‘अल निनो’ची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय

महाराष्ट्र टाइम्स

अल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाणी नियोजन, जलसंधारण आणि जुन्या जलस्रोतांच्या दुरुस्तीवर भर दिला जाईल. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मात्र, पॉझिटिव्ह 'आयओडी'मुळे परिणामांची तीव्रता कमी होऊ शकते.

urgent measures for effective management of el nio

संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीची झळ कमी बसावी यासाठी सर्व विभागांनी त्वरित उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांच्यासह कृषी, मदत व पुनर्वसन, वित्त, जलसंपदा , जलसंधारण , भारतीय हवामानशास्त्र विभाग, वित्त व नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता असून पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मेमध्ये उष्णतेची तीव्रता तुलनेने कमी राहील, मात्र उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. दरम्यान, पॉझिटिव्ह ‘आयओडी’ विकसित झाल्यास अल निनोच्या परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले.