बच्चू कडूंना शिवसेनेची ‘ऑफर’?

महाराष्ट्र टाइम्स

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. कडू यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. अमरावती विभागात शिवसेनेला प्रभावी नेत्याची गरज आहे. कडू हे चार वेळा आमदार राहिले आहेत. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली आहेत.

बच्चू कडूंना शिवसेनेची ‘ऑफर’?
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबईत झालेल्या सुमारे अर्धा तासाच्या बैठकीत कडू आणि शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, बच्चू कडू यांनी अतिशय सावध पवित्रा घेत, आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार, अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे समजते. यासंदर्भात बच्चू कडू यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना ‘ऑफर’ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजकीय हालचालींमुळे मुंबईसह थेट अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. येत्या १२ मे रोजी ही विधान परिषदेची निवडणूक होत आहे.

अमरावती विभागात सध्या शिवसेनेकडे जनआंदोलने उभी करणारा प्रभावी नेता नाही. ही उणीव बच्चू कडू यांच्या माध्यमातून भरून काढण्याची तयारी शिंदे यांनी केली आहे. अचलपूर मतदारसंघातून चार वेळा कडू हे आमदार म्हणून निवडून आले. शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवरून त्यांची आंदोलने राज्यभरात गाजली. नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. ही कर्जमाफी व्हावी म्हणून अलीकडेच त्यांनी मेळघाटात ११ दिवस शेतकरी संघर्ष यात्रा काढली होती. या प्रत्येक वेळी शिंदे यांनी कडू यांच्याशी संवाद साधला. कर्जमाफीचे संपूर्ण श्रेयही त्यांनी जाहीररित्या कडू यांना दिले होते. आता थेट पक्षाकडून विधान परिषदेची ऑफर देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून ‘प्रहार’चा आवाज थेट मुंबईच्या पटलावर पोहोचणार की कडू पुन्हा एकदा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आपला स्वतंत्र बाणा दाखवणार, याकडे अमरावती जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.