गृह विभागाने सोमवारी राज्यातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यात गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून एम. रमेश तर वाशीमच्या पोलिस अधीक्षकपदी राजकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून रोखल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना सांगलीच्या पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सातारा पोलिस अधीक्षकपदी पुण्याचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची बदली झाली आहे.
दोशी यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. शिवसेनेच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर दोशी यांची बदली करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सातारा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेले निखिल पिंगळे हे २०१५चे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आजवर पुणे, लातूर, गोंदिया या ठिकाणी आपल्या कामाची छाप पाडली आहे. विशेषतः पुण्यात बोकाळलेला बेकायदेशीर वेश्या व्यवसाय, मसाज सेंटर आणि अवैध व्यवसायांवर छापे टाकून हे अवैध व्यवसाय पुणे शहरातून हद्दपार करण्याचे महत्त्वाचे काम पिंगळे यांनी केले. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण झाला होता. आता साताऱ्यातील अवैध व्यवसायांवरही त्यांची करडी नजर असणार आहे.





