निर्णय पोटनिवडणुकीनंतरच

Contributed byअनुराग कांबळे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बारामती पोटनिवडणुकीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल. सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर या पदावर कोणाला बसवायचे यावर विचार होईल. हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावे यासाठी पक्ष आग्रही आहे. महायुतीतील शिवसेनाही या पदावर दावा करत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हे पद सोडण्यास तयार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.

निर्णय पोटनिवडणुकीनंतरच

‘सध्या आम्ही आम्ही सर्व लक्ष हे सुनेत्रा पवार यांना बारामती पोटनिवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आणण्याकडे केंद्रित केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याविषयी कुठलीही चर्चा झालेली नाही. हे पद राष्ट्रवादीकडेच राहावे, याविषयी आमच्या मनात कुठलीही शंका नसून ती आमची आग्रही मागणी आहे. निवडणूक झाल्यानंतर सुनेत्रा पवार याविषयी निर्णय घेतील. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल’, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद एक महिन्यापासून रिक्त असून, याविषयीचा निर्णय बारामती विधानसभा पोटनिवडणुकीनंतरच घेण्यात येणार आहे. नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा सातत्याने आरोप होत असल्याने रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, हे पद पक्षाकडेच राहावे, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. पोटनिवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून याविषयी अंतिम निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे, असे पक्षाने म्हटले आहे.

चाकणकर यांची ऑक्टोबर २०२१मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, भोंदू अशोक खरातशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप सातत्याने झाल्याने त्यांनी २० मार्चला पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला. त्यानंतर पवार यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविला. परंतु, हे पद रिक्त झाल्यापासून एक महिना होत आला तरीही कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

चाकणकर यांनी राजीनामा दिल्यापासून पदावर वर्णी लागावी यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. परंतु, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होत नसल्याने सुनेत्रा पवार यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी पक्षाची संपूर्ण यंत्रणाच निवडणुकीत व्यग्र आहे. त्यामुळे पदाबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. परंतु, चाकणकर यांनी राजीनामा दिला असला तरी हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम राहावे याबाबत पक्षातील नेते आग्रही असल्याचे कळते. महायुतीतील शिवसेनाही या पदावर दावा सांगत आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत पद दुसरीकडे जाऊ द्यायचे नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीकडून मांडण्यात आली आहे.