शहरात गेल्या १० ते १५ वर्षांपासून कार्यरत श्री श्याम सेवक मंडळाने श्री खाटू श्याम बाबांचे भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. चांदशी शिवारात एक एकर जागेत हे मंदिर उभारण्यात येणार असून, पुढील दोन-अडीच महिन्यांत मंदिराची पायाभरणी करण्यात येणार आहे.
राजस्थानात श्री खाटू श्याम बाबांचे मंदिर असून, देशभरातून भाविक तेथे दर्शनासाठी जातात. नाशिकमधूनही मोठ्या संख्येने भाविक खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जातात. शहरातही गेल्या काही वर्षांपासून भक्त परिवाराच्या वतीने श्याम बाबांच्या भजनांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भक्त परिवाराने खाटू श्याम बाबांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असून, पायाभरणी सोहळ्याचा शुभारंभ प्रसिद्ध श्याम भजन गायक कन्हैया मित्तल आणि श्याम अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मंदिराचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिर उभारणीच्या आराखड्यासाठी सुरत येथील अनुभवी आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच बांधकामाचा आराखडा तयार होणार असून, भूमिपूजनानंतर लगेचच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.





