भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मनमाडमध्ये भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. निफाड तालुक्यात शेतकऱ्यांचे कृषी पंप फोडून तांब्याच्या तारा चोरल्या गेल्या. येवला तालुक्यात कोळगाव येथे तीन झोपड्या जळून खाक झाल्या. सिन्नर तालुक्यात बीअर बार फोडून चोरी झाली. तसेच नायगाव येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा

मनमाड : भगवान परशुराम जयंतीनिमित्त रविवारी (दि. १९) रात्री शोभायात्रा काढण्यात आली. नीलमणी गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत आकर्षक सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये भगवान परशुरामांची प्रतिमा ठेवून अभिवादन व आरती करण्यात आली. परशुराम प्रतिष्ठान आणि ब्राह्मण मंडळाने शोभायात्रेचे नेटके संयोजन केले. वेदिका महिला मंडळाच्या ध्वज पथकाने विविध प्रात्यक्षिके सादर करून मिरवणुकीत रंगत आणली. यावेळी महिलांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. पल्लवी कार्यालयात भगवान परशुरामांची आरती व रामरक्षा पठण झाले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. शोभायात्रेत संत व क्रांतिकारकांच्या वेशातील बालकांनी विशेष लक्ष वेधले.

विद्युत पंपांमधील तांब्याच्या तारांची चोरी

भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा

भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा

निफाड : तालुक्यातील काथरगाव येथे कादवा नदीकिनारी अज्ञात चोरट्यांनी पाच विद्युत कृषी पंप फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. १८ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कृषी पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार एस. एस. सोनवणे करीत आहेत.

कोळगावला झोपड्या भस्मसात; लाखोंचे नुकसान

येवला : तालुक्यातील कोळगाव शिवारात शेजारी शेजारी बांधलेल्या तीन झोपड्या अकस्मात लागलेल्या आगीच्या भस्मसात झाल्या. शेतमजूर सुरेश वाळीबा मोरे यांचे या आगीत अन्न- धान्य, कपडे, भांडी, कागदपत्र याचेसह संसार उपयोगी साहित्य, पैसे जळून खाक झाले. तसेच झोपडीच्या शेजारी बांधलेली गाय देखील या आगीने होरपळून जखमी झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. सदर घटना शुक्रवारी, (दि. १७) रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, तलाठी संकेत मारवत यांनी आज, (सोमवार, दि. २०) नुकसानीचा पंचनामा केला असून, यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

बीअर बार फोडून सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे जुन्या नाशिक–पुणे महामार्गालगत असलेल्या विशाल बीअरबार व परमिट रुममध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करून सुमारे एक लाख १९ हजार ६३० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेत विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. चोरट्यांनी बारच्या पाठीमागील खिडकीची ग्रील तोडून आत प्रवेश केला. मास्क घालून आलेल्या चोरट्यांची हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, काही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून ते बंद करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. राजू मारुती शेळके यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी स्टॉक रूमचे कुलूप तोडून १८० मिलीच्या विविध विदेशी कंपन्यांच्या सुमारे ४३० बाटल्या, अंदाजे १ लाख रुपयांचा माल, तसेच काउंटरमधील १९ हजार ६३० रुपये रोख रक्कम चोरून नेली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला.

नायगाव येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सिन्नर : तालुक्यातील नायगाव येथे ५९ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. छबू केरु आंबेकर (वय ५९) रा. नायगाव असे मृत इसमाचे नाव आहे. आंबेकर यांनी राहत्या घराजवळ शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. हवालदार अमोल गुंजाळ अधिक तपास करीत आहे.